एकनाथ शिंदेंचा सत्कार करणाऱ्या शरद पवारांवर संजय राऊतांची बोचरी टीका, म्हणाले, "राज्याच्या शत्रूंना…’’
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 10:32 IST2025-02-12T10:31:16+5:302025-02-12T10:32:10+5:30
Sanjay Raut Criticize Sharad Pawar: शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा केलेला सत्कार आणि कौतुकामुळे शिवसेना ठाकरे गट संतप्त झाला असून, ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे. राज्याच्या शत्रूंना अशा प्रकारे पुरस्कार देणं आम्हाला पटलेलं नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

एकनाथ शिंदेंचा सत्कार करणाऱ्या शरद पवारांवर संजय राऊतांची बोचरी टीका, म्हणाले, "राज्याच्या शत्रूंना…’’
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना मंगळवारी दिल्लीमध्ये ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वगुणांचेही कौतुक केले. दरम्यान, शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा केलेला सत्कार आणि कौतुकामुळे शिवसेना ठाकरे गट संतप्त झाला असून, ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे. राज्याच्या शत्रूंना अशा प्रकारे पुरस्कार देणं आम्हाला पटलेलं नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या सत्कारावरून शरद पवार यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआमपणे बसलेले आहेत. त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणारं आहे, ही आमची भावना आहे. कदाचित शरद पवार यांची भावना वेगळी असेल. पण महाराष्ट्राच्या जनतेला हे पटलेलं नाही. पवार साहेब, आपण ज्येष्ठ नेते आहात, आम्ही तुमचा आदर करतो. पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अमित शाहांच्या सहकार्याने तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला. अशांना आपण सन्मानित केलं, यामुळे मराठी माणसाच्या हृदयाला नक्कीच वेदना झाल्या असतील. पवारसाहेब, आम्हाला तुमचं दिल्लील राजकारण जे काही आहे ते आम्हाला माहिती नाही, आम्हालाही राजकारण कळतं. पण आम्हाला सर्वांना आणि महाराष्ट्राला या गोष्टीमुळे नक्कीच वेदना झालेल्या आहेत, असा दावाही संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत पुढे म्हणाले की, काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात. तुमचं आणि अजित पवार यांचं गुफ्तगू होत असेल, हा तुमचा व्यक्तिगत कौटुंबिक प्रश्न असेल. तरही आम्ही अजित पवार यांनी तुमचा पक्ष फोडला, कुटुंब फोडलं. याचं भान राखून आम्ही आमची पावलं टाकत आलो आहोत, असेही संजय राऊत यांनी सुनावले.
यावेळी शरद पवार यांनी ठाण्यातील राजकारणावरून एकनाथ शिंदे यांच्या केलेल्या कौतुकाबाबतही संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, हे खोटं आहे. पवार साहेबांकडे चुकीची माहिती आहे. ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याचं काम मागच्या ३० वर्षांमध्ये शिवसेनेने केलेलं आहे. कुणाला माहिती नसेल तर सांगतो ठाण्याचा विकास हा सतीश प्रधान यांच्या काळात झाला. ठाण्यामधील दादोजी कोंडदेव मैदान, गरकरी रंगायतन ह्या सर्व बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पना होत्या. सतीश प्रधान नगराध्यक्ष होते, ठाण्याचे पहिले महापौर होते, अनेक पदांवर होते. त्यांना विकासाची दृष्टी होती. त्यानंतर शिवसेनेचे अनेक महापौर झाले. एकनाथ शिंदे ठाण्याच्या राजकारणात फार उशिरा आले. पवार साहेबांना जर माहिती हवी असेल तर त्यांना आमचे ठाण्यातले कार्यकर्ते माहिती देऊ शकतात, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.