'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 21:32 IST2025-07-23T21:31:44+5:302025-07-23T21:32:20+5:30
Sanjay Raut praises Nitin Gadkari: नितीन गडकरी हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील मातब्बर नेतेमंडळींपैकी एक आहेत.

'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
Sanjay Raut praises Nitin Gadkari: लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. शुक्रवार, १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या १०५व्या पुण्यतिथीच्या दिवशी टिळक स्मारक मंदिरात होणाऱ्या सोहळ्यात पुरस्काराचे वितरण होणार आहे. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये असे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
नितीन गडकरी हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील मातब्बर नेतेमंडळींपैकी एक आहेत. भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. नितीन गडकरी यांना पुरस्कार जाहीर झाल्याचा साऱ्यांनीच आनंद व्यक्त केला. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नितीन गडकरी यांच्यासाठी खास पोस्ट केली. "देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! राजकारणातील योग्य व्यक्तीचा गौरव केल्याबद्दल पुरस्कार देणाऱ्या संस्थेचे कौतुक!" असे संजय राऊत यांनी ट्विट केले.
देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 23, 2025
राजकारणातील योग्य व्यक्तीचा गौरव केल्या बद्दल पुरस्कार देणाऱ्या संस्थेचे कौतुक!
@nitin_gadkari pic.twitter.com/DCowfLVDor
लोकमान्य टिळक राष्ट्रीय सन्मान देऊन गौरविलेल्या आजवरच्या पुरस्कारार्थींच्या जीवन कार्याचा आढावा घेणारा इंग्रजी ग्रंथ तयार करण्यात आला आहे. या ग्रंथाचे प्रकाशन पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होईल. रस्ते हे विकासाचे साधन आहे, हे ओळखून नितीन गडकरी यांनी देशभर महामार्गांचे जाळे उभारले. सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या प्रारूपातून त्यांनी देशातील पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. नमामी गंगा प्रकल्पाला त्यांच्याच प्रयत्नाने लोकचळवळीचे स्वरूप आले. लोकमान्यांच्या चतु:सूत्रीतील स्वदेशीचा स्वीकार करत रस्त्यांच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीसाठी गडकरी कार्यरत आहेत. अशा व्यक्तीचा गौरव करण्यास आम्हालाही आनंद होत आहे, असे रोहित टिळक म्हणाले. या पुरस्कार वितरण सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत. डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण होईल.