“गणेश नाईक कसलेले पैलवान, अंतिम तेच विजयी होतील, शिंदे हे...”; संजय राऊतांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 17:14 IST2025-10-17T17:11:57+5:302025-10-17T17:14:10+5:30
Sanjay Raut News: नुकसान भरपाईच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला.

“गणेश नाईक कसलेले पैलवान, अंतिम तेच विजयी होतील, शिंदे हे...”; संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut News: आगामी मुंबई मनपासह राज्यसभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. महायुतीतील शिवसेना शिंदे गट, भाजपा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून काही ठिकाणी स्वबळाचा नारा दिला जात आहे. तर दुसरीकडे नवी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा नेते तसेच मंत्री गणेश नाईक यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले.
संजय राऊत हे शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी पत्रकारांशी बोलत होते. पालघर मध्ये येणारे अनेक प्रकल्प हे नरेंद्र मोदी, अमित शाह आणि अदानीच्या फायद्यासाठी आहेत, असा दावा संजय राऊतांनी केला. तसेच पालघर जिल्ह्यात वाढवण, मुरबे येथे बंदर व केवळ येथे रिलायन्स प्रकल्प येत असल्याबाबत बोलताना, भूमिपुत्रांच्या छाताडवर हे प्रकल्प लादले जात आहेत. या प्रकल्पांमध्ये मोदी, शाह यांची वैयक्तिक गुंतवणूक असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. नुकसान भरपाईच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक केली जात असून, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा झालेली आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली.
...तर काय अमित शाह यांची आठवण येणार का?
भाजपाचे नेते व राज्याचे वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेल्या शीतयुद्धाविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, गणेश नाईक हे कसलेले पैलवान असून अंतिम तेच विजयी ठरतील. गणेश नाईक यांनी कधी संयम सोडला नाही, असे त्यांनी सांगितले. दुसरीकडे, इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली होती. यावर बोलताना, सोडा हो शिंदे, भावाची आठवण नाही येणार तर काय अमित शाह यांची आठवण येणार का? असा सवाल राऊतांनी केला.
दरम्यान, दिवाळीनिमित्त मनसे दरवर्षी दीपोत्सवाचे आयोजन करत असते. यावर्षी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या दीपोत्सवाचे उद्घाटन होणार असून, ही महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घडामोड आहे व शिवसेना-मनसे युती संदर्भात प्रगतीची झेप आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.