Sanjay Raut News: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका दीर्घ पत्रकार परिषदेत भाजप व निवडणूक आयोगावर ‘मतचोरी’चा थेट आरोप केला. राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर अनेक गंभीर आरोप करत बोगस मतदारांबाबत मोठा दावा केला. राहुल गांधी यांनी कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील मतदार यादी दाखवून एकाच व्यक्तीचं नाव वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि मतदान केंद्रांवर नोंदवलेले असल्याचा दावा केला. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होत असून, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेल्या एका खळबळजनक दाव्याला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुष्टी जोडली आहे.
संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, निवडणूक आयोगात इतके घोटाळे आहे. शरद पवार यांनी मुद्दा मांडला, निवडणुकीपूर्वी लोक भेटले आणि १६० जागा देतो. आम्हाला ही लोक भेटले आहे. उद्धव ठाकरे यांना लोकसभेला आणि विधानसभेला पण हे लोक भेटले होते. पण तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही लोकांमध्ये जाऊ. लोकसभेला आम्हाला यश प्राप्त झाले आहे. तेव्हा पुन्हा ते विधानसभेलाही मिळेल. ते म्हणालेले ६०-६५ जागा कठीण जागा सांगा, आम्ही त्या देऊ. पण आमचा निवडणूक आयोगावर विश्वास होता. पण आता राहुल गांधी यांनी पुरावे दिले त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
राहुल गांधी जबाबदारीने बोलतात
राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. ते जबाबदारीने बोलतात. त्यांनी यावर शोध संशोधन केले आहे. ते पुराव्यासह बोलले आहेत. राहुल गांधी यांनी मत चोरीचे जे पुरावे समोर ठेवले आहेत, त्याची शहनिशा अनेक मीडियाने केली. तरीही निवडणूक आयोग जर पुरावे मागत असेल तर त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे आणि तोंडात बोळा कोंबला आहे, हे स्पष्ट दिसत आहे. अशा निवडणूक आयोगाविरुद्ध इंडिया आघाडीचा लाँग मार्च आहे. आम्ही ज्याला मतदान करतो, ते समजावे, यासाठी व्हीव्हीपॅटची व्यवस्था सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून झाली आहे. पण आता निवडणूक आयोग म्हणत आहे की, हे नसणार मग आम्हाला कसे कळणार आमचे मत कुठे गेले आहे, असा मुद्दा संजय राऊतांनी उपस्थित केला.
दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झाली त्यापूर्वी दिल्लीत दोन लोक मला भेटायला आले. त्यांची नावे आता माझ्याकडे नाहीत. त्यावेळी त्यांनी सांगितले की, राज्यात २८८ जागा आहेत. आम्ही तुम्हाला (महाविकास आघाडी) १६० जागा निवडून येण्याची हमी देतो. त्यावेळी निवडणूक आयोग या संस्थेबद्दल माझ्या मनात शंका नव्हती. त्यामुळे मी त्याकडे दुर्लक्ष केले. यानंतर आपण त्यांची भेट राहुल गांधी यांच्याशी घालून दिली; पण त्यावेळी राहुल गांधी व मी दोघांनीही हा आपला रस्ता नाही, आपण लोकांमध्ये जाऊन त्यांचा आशीर्वाद मिळवू, असा निर्णय घेतला, असा खळबळजनक गौप्यस्फोट शरद पवारांनी केला.