Sanjay Raut on IND-PAK Asia Cup 2025: दुबईत खेळल्या गेलेल्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरुन भारतात राजकीय वादळ उठले आहे. सामान्य नागरिकांसह अनेक नेत्यांनी सामना रद्द करण्याची मागणी केली होती. अशातच आता, उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या सामन्याबाबत एक मोठा दावा केला आहे. हा सामना पूर्णपणे फिक्स होता आणि यातून पाकिस्तानला 50,000 कोटी रुपयांचा फायदा झाल्याचे राऊतांचे म्हणने आहे.
निर्लज्ज सरकार...
शिवसेना (उबाठा)चे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी (15 सप्टेंबर) पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, “भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना होणे ही सरकारची निर्लज्जता आहे. दुबई, अबूधाबी किंवा कुठल्याही मैदानावर सामना झाला असो...भारत-पाकिस्तान सामना खेळला गेला, हा आपल्या शूर सैनिकांचा, शहीदांचा आणि महिलांचा अपमान आहे. सामना खेळून सिंदूर परत येणार आहे का?’’ असा सवाल त्यांनी यावेळी केला.
पाकिस्तानला 50 हजार कोटी रुपये मिळाले
राऊत पुढे म्हणतात, “हा सामना फिक्स होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला 1000 कोटी मिळाले. सामन्यावर दीड लाख कोटी रुपयांचा सट्टा लागला होता, त्यातील 50 हजार कोटी पाकिस्तानात गेले. एकीकडे केंद्र सरकार आयएमएफ आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेला सांगते की, पाकिस्तानला कर्ज देऊ नका, ते पैसे दहशतवादी कारवायांमध्ये वापरले जातील. पण काल भारताच्या मदतीने पाकिस्तानला मिळालेल्या पैशांचे काय? अमित शाह यांचा मुलगा जय शाह यांनी पाकिस्तानला हे पैसे दिले. हे पैसे दहशतवादासाठीच वापरले जाणार आहेत. पाकिस्तानला त्यांच्या दहशतवादाला 'बळकट' करण्यासाठी निधी देण्याची त्यांची रणनीती आहे, जेणेकरुन ते आपल्यावर हल्ला करतील आणि याचा त्यांनाच राजकीय फायदा मिळेल,’’ असा गंभीर आरोपही संजय राऊतांनी केला.
शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
या सामन्याविरोधात शिवसेना (उबाठा)ने आधीच आंदोलनाचा इशारा दिला होता. सिंदूर रक्षा आंदोलन शिवसेनेने चालवले. विरोधकांचा आरोप होता की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होऊ नये. दरम्यान, रविवारी (14 सप्टेंबर) झालेल्या आशिया चषकातील या चर्चित सामन्यात भारताने पाकिस्तानवर सात गडी राखून मात केली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानची संघ 20 षटकांत 9 गडी गमावून फक्त 127 धावा करू शकला. प्रत्युत्तरात भारताने 15.5 षटकांत 3 गडी गमावून 131 धावा करत सामना सहज जिंकला.