Naresh Mhaske: संजय राऊतांमुळेच आनंद दिघेंवर टाडा लागला, नरेश म्हस्के यांचा खळबळजनक आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 15:24 IST2025-05-28T15:22:14+5:302025-05-28T15:24:33+5:30
Naresh Mhaske on Sanjay Raut: शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांचे संजय राऊतांवर खळबळजनक आरोप केला.

Naresh Mhaske: संजय राऊतांमुळेच आनंद दिघेंवर टाडा लागला, नरेश म्हस्के यांचा खळबळजनक आरोप
शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आणि त्यांच्यावर दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्याबद्दल दीर्घकाळापासून द्वेष असल्याचा आरोप केला. संजय राऊत यांच्या मुलाखतीमुळेच दिघे यांच्यावर टाडा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला. त्यामुळे संजय राऊतांना स्वप्नातही धर्मवीर आनंद दिघे दिसणे अशक्य आहे,असे म्हस्के म्हणाले.
पत्रकारांशी बोलताना म्हस्के म्हणाले की, "हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी मुसळधार पावसात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अथक परिश्रमाचे कौतुक केले. बाळासाहेब म्हणाले की, त्यांना एकनाथ शिंदे यांचा अभिमान आहे. मुसळधार पावसातही ते जनतेच्या मदतीला धावून गेले. पण माझ्यामुळे सत्तेत आलेले, मुंबई महानगरपालिकेत वर्षानुवर्षे सत्ता उपभोगणारे भित्र्यासारखे घरात लपून बसले. हे लोक एकेकाळी माझे शिष्य होते, पण आता मला त्यांची लाज वाटते, असेही बाळासाहेब म्हणाले."
🏹LIVE | 27-05-2025 📍ठाणे शिवसेना प्रवक्ते व खासदार नरेश म्हस्के यांची पत्रकार परिषद https://t.co/Meu5u6WSCd
— Shivsena - शिवसेना (@Shivsenaofc) May 27, 2025
पुढे म्हस्के म्हणाले की, महाविकास आघाडी सत्तेत असताना संजय राऊत आणि त्यांचे सहकारी दिल्लीतील सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर वाट पाहत होते. तेव्हा ते कोणाला खूश करण्याचा प्रयत्न करत होते हे सर्वांनी पाहिले.
महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण
नुकतीच झालेल्या एनडीए बैठकीत ऑपरेशन सिंदूरसाठी पंतप्रधान मोदी आणि सशस्त्र दलांचे अभिनंदन करणारा ठराव मांडण्याचा मान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आला. एनडीएने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना परदेशात भारतीय संसदीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवली, हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे, असेही म्हस्के म्हणाले.