"मी मूर्खांना उत्तरे देत नाही"; CM फडणवीसांच्या विधानावर राऊत म्हणाले, एवढे चिडता कशाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 18:15 IST2025-04-11T17:54:59+5:302025-04-11T18:15:12+5:30
तहव्वूर राणा प्रकरणावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

"मी मूर्खांना उत्तरे देत नाही"; CM फडणवीसांच्या विधानावर राऊत म्हणाले, एवढे चिडता कशाला?
Sanjay Raut on Tahawwur Rana extradition : मुंबई २६/११ दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर हुसेन राणाला अमेरिकेतून भारतात आणण्यात आलं. कोर्टाने तहव्वुर राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली. तपास यंत्रणा तहव्वुर राणाकडे मुंबई दहशतवादी हल्ल्याची कसून चौकशी करत आहे. दुसरीकडे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावरुन भाजपवर निशाणा साधला आहे. तहव्वूर राणाला भारतात आणण्यामागे राजकीय हेतू असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. बिहार निवडणुकीदरम्यान त्याला फाशी दिली जाईल, असेही संजय राऊत म्हणाले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांना टोला लगावला होता. आता संजय राऊतांनीही मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
तहव्वूर राणाला भारतात आणण्यामागे राजकीय हेतू आहे. बिहार आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या आधी राणाला फासावर चढवतील आणि या मुद्द्याचा निवडणुकीपूर्वी प्रचारासाठी वापर करतील, असं विधान संजय राऊत यांनी केले होते.राणाला भारतात आणले गेले असेल तर प्रशासनाचे आणि तपास यंत्रणांचे कौतुक केले पाहिजे, त्यासाठी भाजपने श्रेय घ्यायचे कारण काय आहे? असाही सवाल राऊतांनी केला.
मुंबईत पत्रकार परिषदेत पत्रकारांनी संजय राऊत यांच्या दाव्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. "मी मूर्खांना उत्तरे देत नाही. तुम्ही हे चालवा मी पुन्हा सांगतोय. मी मूर्खांना उत्तरे देत नाही," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हा व्हिडीओ भाजप समर्थकांकडून व्हायरल केला जात आहे. संजय राऊत यांनीही हा व्हिडीओ पोस्ट करत भाजपला सवाल विचारला आहे.
"एवढे चिडता कशाला? cool cool… तुमच्या चिडा चिडीतच सगळं उघड झालय भाऊ… भाजपचा "तहव्ववूर राणा" फेस्टिवल सुरू झालाय. जनतेला मूर्ख समजता काय?," असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
"मुंबईवर हल्ला करणाऱ्या आणि षडयंत्र रचणाऱ्याला भारतात आणलं याचा आनंद आहे. भारतीय न्याय व्यवस्थेसमोर गुन्हासाठी सामोरे जावं लागेल यासाठी पंतप्रधानांचे आभार मानतो. कसाबला शिक्षा दिली. मात्र षड्यंत्रकारी राणाला आणलं आणि यासंदर्भात एनआयएला मदत हवी असेल तर मदत करु," अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.