दिल्लीच्या ‘पुतिन’कडून दररोज ‘मिसाइल’चा मारा; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टाेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 06:12 IST2022-03-24T06:10:29+5:302022-03-24T06:12:01+5:30
‘लोकमत’ पत्रमहर्षी पुरस्कार सोहळ्यात केंद्र सरकारवर केली खरमरीत टीका

दिल्लीच्या ‘पुतिन’कडून दररोज ‘मिसाइल’चा मारा; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टाेला
नागपूर : ‘रशिया-युक्रेनप्रमाणे आपल्या देशात प्रत्यक्ष युद्ध सुरू नसले तरी आमच्यासारख्यांना दररोज युद्धाचा अनुभव येत आहे. दिल्लीतील ‘पुतीन’ आमच्यावर रोज ईडी, सीबीआय आदी केंद्रीय यंत्रणारुपी ‘मिसाइल्स’चा मारा करीत आहेत. आम्ही त्यांच्या हल्ल्यापासून वाचलो आहोत,’ अशा शब्दांत शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली.
‘लोकमत’तर्फे देण्यात येणाऱ्या पत्रपंडित पां. वा. गाडगीळ स्मृती आर्थिक-विकासात्मक लेखन आणि पत्रमहर्षी म. य. उपाख्य बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यात राऊत बोलत होते.
पत्रकारिता भयाखाली
देशात तटस्थ पत्रकारिता कुठेतरी भयाच्या छायेखाली आहे; परंतु ‘लोकमत’सारख्या वृत्तपत्रांनी देशाला नेहमीच दिशा दिली आहे. मराठी पत्रकारिता कुणापुढे वाकत नाही व ती झुकतदेखील नाही. हीच परंपरा पुढेही निश्चितपणे कायम राहील, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.
सकारात्मक पत्रकारिता ही काळाची गरज : दर्डा
‘लोकमत’ने नेहमी जनसामान्य, शोषित, वंचितांचा आवाज उंच करणारी व त्यांना न्याय मिळवून देणारी पत्रकारिता केली आहे. सकारात्मक व समाजहिताची पत्रकारिता ही काळाची गरज आहे व ती आणखी दर्जेदार झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. अगदी ग्रामीण पत्रकारांनादेखील मंच मिळावा, यासाठी ‘लोकमत’चे संस्थापक संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रेरणेतून हे पुरस्कार सुरू झाले. संपादकांच्या नावाने पुरस्कार देणारे ‘लोकमत’ एकमेव वृत्तपत्र असून, निर्भीड व समाजाभिमुख पत्रकारितेची परंपरा कायम राहील, असा विश्वास ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केला.