"संजय राऊत यांना पिसाळलेला कुत्रा चावलाय"; सीमाप्रश्नावरून शिंदे गटाच्या आमदाराची जहरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 18:12 IST2022-12-02T18:11:34+5:302022-12-02T18:12:30+5:30
"संजय राऊत यांनी आज कर्नाटक प्रश्नावर जे मत मांडले आहे, मला वाटते, की त्यांना पुन्हा पिसाळलेला कुत्रा चावला आहे."

"संजय राऊत यांना पिसाळलेला कुत्रा चावलाय"; सीमाप्रश्नावरून शिंदे गटाच्या आमदाराची जहरी टीका
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी कर्नाटक सरकारने जतमध्ये सोडलेल्या पाण्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सरकारने, कर्नाटकनं सोडलेल्या पाण्यात जलसमाधी घ्यायला पाहिजे. या महाराष्ट्रावर असे आक्रमण आणि अतिक्रमण गेल्या 50-55 वर्षांत झाले नव्हते. बाजूच्या राज्याचा मुख्यमंत्री तुम्हाला सरळ डिवचतोय, आव्हान देतोय या महाराष्ट्राला. ते जे पाणी सोडले आहे ना, चुल्लू भर पाणी में डूब जाओ म्हणतोना आपण, जा त्या पाण्यात जलसमाधी घ्या," असे राऊतांनी म्हटले आहे. त्यांच्या याच वक्तव्यावर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी जहरी शब्दांत टीका केली आहे.
शिरसाट म्हणाले, "संजय राऊत यांनी आज कर्नाटक प्रश्नावर जे मत मांडले आहे, मला वाटते, की त्यांना पुन्हा पिसाळलेला कुत्रा चावला आहे. दर वेळेला नवीन वाद करायचे, जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. तेव्हा यांनी तोंड का उघडले नाही? अडीच वर्ष झोपा काढत होते का हे लोक? त्यावेळी त्यांना हे सुचले नाही. ज्या गोष्टी आपल्या करायच्या नसताता, करता येत नाहीत, त्या दुसऱ्यावर कशा थोपवायच्या हा प्रयत्न त्यांनी केला आहे. संजय राऊत कडून अपेक्षा काय करता?," असा सवालही त्यांनी केला.
शिरसाट म्हणाले, ते आम्हाला म्हणतात, आमच्या कपाळावर गद्दार कोरल्या जाणार आहे? अरे तुमच्या पेक्षा जास्त शिवसेने आम्ही पाहिली आहे. तुम्ही आम्हाला काय शिवसेना शिकवता? शिवसेनेत काय चालतं आणि काय केलंय आम्ही, हे आमच्या जीवाला विचारा. आम्ही तेथे ३८ वर्ष काढली आहेत आणि यांच्यासारखे पगारदार नौकर आमच्यासंदर्भात बोलत असतील ना, तर त्यांनी त्यांच्या नौकऱ्या कराव्यात. हे सांगावे की, सामनाचे संपादक पद मी सोडले आहे. मला भुंकायसाठी ठेवले आहे आणि तुम्ही भुंकत राहा. तुमच्या भुंकण्याने महाराष्ट्रावर काहीही परिणाम होणार नाही. आम्ही मजबुतीने काम करत आहोत. म्हणून आमच्या नादी आता लागू नका."
आणखी काय म्हणाले होते राऊत? -
नाशिकमध्ये पत्रकारांसोबत बोलताना राऊत यांनी म्हटले होते, की जर तुम्हाला स्वाभिमान असेल. ज्या स्वाभिमानाच्या मुद्द्यावर तुम्ही शिवसेना सोडली म्हणता मग आता तुमचा स्वाभिमान कुठे गेला? कर्नाटकचा मुख्यमंत्री रोज तुमच्या तोंडावर, सरकारवर थुंकतोय. 3 महिन्यापूर्वी क्रांती केली म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता क्रांती करावी. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सुरू आहे. तुमच्या क्रांतीची वांती झाली का? असेही त्यांनी म्हटले होते.