Sanjay Raut Bail: 'संजय राऊतांवर दबाव होता, पण त्यांनी गद्दारी नाही केली', आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 14:04 IST2022-11-09T14:03:52+5:302022-11-09T14:04:59+5:30
Sanjay Raut Bail: मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

Sanjay Raut Bail: 'संजय राऊतांवर दबाव होता, पण त्यांनी गद्दारी नाही केली', आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Raut Bail : मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. तब्बल 100 दिवसानंतर राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या जामीनावर आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत यांच्या जामीनाबाबत विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले की, 'संजय राऊत निष्ठावंत शिवसैनिक आहेतच, पण ते बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहेत. सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर दबावतंत्राचा वापर केला, पण त्यांनी पक्षाशी गद्दारी केली नाही. ते इतरांसारखे उगाचच नाव लावून फिरत नाहीत, मुखवटे लावून फिरत नाहीत,' अशी टीका आदित्य यांनी केली.
पुढे म्हणाले की, 'जो कोणी सत्तेविरोधात आवाज उठवतो, सरकारविरोधात बोलतो, त्याच्यावर दबावतंत्र वापरले जाते. आज राजकीय लोकांवर कारवाई होत आहे, उद्या सामान्यांवर किंवा ज्यांना एचएमव्ही बोलतात, त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते. ही देशासाठी सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे. संजय राऊत डरपोक नाहीत, हे लोकांसमोर आलं. जे डरपोक होते ते पळून गेले,' अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
काय आहे प्रकरण?
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी रात्री उशिरा ईडीने अटक केली होती. त्यानंतर संजय राऊत यांना प्रथम ईडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तेव्हापासून संजय राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत. ईडीने संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप केला आहे. संजय राऊत यांचे भाऊन प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते.