“शरद पवार भाजपा महायुतीसोबत जाण्याचा विचार करणार नाहीत”; मविआतील नेत्यांना ठाम विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 12:36 IST2024-12-13T12:35:26+5:302024-12-13T12:36:17+5:30
Maharashtra Politics News: शरद पवार पुरोगामी विचाराला धरून चालले. शरद पवारांनी कष्टाने निवडून आणलेले खासदार हे लोक फोडू पाहत आहेत. जे कुणी फुटणार असतील त्यांना लाज वाटली पाहिजे, अशी टीका करण्यात आली आहे.

“शरद पवार भाजपा महायुतीसोबत जाण्याचा विचार करणार नाहीत”; मविआतील नेत्यांना ठाम विश्वास
Maharashtra Politics News: देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून नवनिर्वाचित आमदारांना शपथबद्ध करण्यात आले. यानंतर विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. परंतु, अद्यापही खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीचा निर्णय झालेला दिसत नाही. यातच महाविकास आघाडीतील काही नेते महायुतीच्या संपर्कात असल्याचे दावे केले जात आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सत्तेत जाण्याच्या बाजूने आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
महाविकास आघाडीतील आमदार महायुतीच्या संपर्कात आहेत. तसेच शरद पवार गटाचे खासदार, आमदार अजित पवार गटाच्या संपर्कात आहेत, या चर्चांवर बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, मी शरद पवारांना ओळखतो. राज्यसभेत आम्ही बाजूबाजूलाच बसतो. मला वाटत नाही की, शरद पवार महायुती सरकारसोबत जाण्याचा विचार करतील. भाजपाच्या गोटात सामील झालेल्यांच्या नादाला लागून ते वेगळा विचार करतील असे वाटत नाही. वाढदिवसानिमित्त शरद पवारांचे सर्व खासदार दिल्लीत उपस्थित होते. काही लोकांनी अद्याप लाज शिल्लक ठेवल्याचे त्यांच्या बोलण्यातून दिसले. बाळासाहेब ठाकरेंनंतर शरद पवार एक मोठे नेते आहेत. जर कुणी त्यांच्याशी बेईमानी केली तर ती महाराष्ट्राशी बेईमानी केल्यासारखे होईल. शरद पवार यांनी कष्टाने निवडून आणलेले खासदार हे लोक फोडू पाहत आहेत. जे कुणी फुटणार असतील त्या फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, या शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.
गौतम अदानी आचार्य विनोबा भावे आहेत का?
उद्योगपती गौतम अदानी यांच्या घरी अलीकडे राजकीय बैठका वाढल्या आहेत. महाराष्ट्राचे भवितव्य ठरविण्याचा प्रयत्न अदानी करत आहेत. ज्यांनी मुंबईचे विमानतळ ताब्यात घेतले, धारावीची हजारो एकर जमीन गिळली, अनेक जकात नाके ताब्यात घेतले. हे गौतम अदानी महाराष्ट्राचे सामाजिक आणि राजकीय भवितव्य ठरविणार आहेत. गौतम अदानी म्हणजे आचार्य विनोबा भावे आहेत का? दादाजी धर्माधिकारी, जमनालाल बजाज किंवा यशवंतराव चव्हाण आहेत का? राजकारणांच्या गटातटात मध्यस्थी करून महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम करत आहेत का? अशी विचारणा संजय राऊत यांनी केली.
दरम्यान, संजय राऊत दिल्लीत आहेत. त्यांच्याकडे माहिती असते. त्यावर बोलले असतील. दिल्लीत ज्या बैठकांचा जोर वाढला आहे यातून कुछ तो गडबड है, असे म्हणण्याला स्कोप आहे. माझ्याकडे माहिती नाही, निवडणुकीनंतर या चर्चा होत असतात. इकडे जाणार तिकडे जाणार, याला महत्व देण्याची गरज नाही. अदानी संदर्भात शरद पवार यांची भूमिका स्पष्ट आहे, त्या संदर्भातील वारंवार भूमिका स्पष्ट केली आहे
शरद पवार पुरोगामी विचाराला धरून चालले, त्यात वेगळ्या दिशेने जाण्यासंदर्भात ते विचार करणार नाहीत अशी खात्री आहे, असा विश्वास व्यक्त करत फोडाफोडीचे राजकरण भाजपा करते, त्याशिवाय भाजपाला चैन पडत नाही, त्यांना त्यातून असुरी आनंद मिळतो, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.