सिंधुदुर्ग: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यापासून पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी खासदार संभाजीराजे राज्यव्यापी दौऱ्यावर असून, अनेक बड्या नेत्यांची ते भेट घेत आहेत. खासदार संभाजीराजे भोसले यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड योद्धे म्हणून बाहेर पडण्याचा सल्ला दिला होता. मुख्यमंत्र्यांच्या या सल्ल्यावर संभाजीराजे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. (sambhaji raje reply to cm uddhav thackeray)
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजेंनी अलीकडेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. त्यानंतर संभाजीराजे सिंधुदुर्गात गेले आहेत. यावेळी संभाजीराजेंनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आरक्षणावर ५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला तेव्हा आम्ही समंजसपणाची भूमिका घेतली होती. मराठा समाजाला संयम राखण्याचा सल्ला मी दिला होता. त्यामुळे त्यावेळी राज्यात उद्रेक झाला नाही, असे संभाजीराजे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मी नाराज नाही, त्यांनी मला नेहमीच सन्मान दिला- छत्रपती संभाजीराजे
मराठा समाजाच्या पाच मागण्या मान्य कराव्या
मुख्यमंत्र्यांनी मला कोविड योद्धे म्हणून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. पण मी पूर्वीपासूनच समाजाचा योद्धा आहे. समाजासाठी लढत आलो आहे. कोविड योद्धा म्हणून मी बाहेर पडावं असं मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर त्यांनी मराठा समाजाच्या पाच मागण्या मान्य कराव्या. येत्या ६ जून रोजी मी माझी पुढील भूमिका स्पष्ट करणार आहे. त्याआधी त्यांनी निर्णय घ्यावा. राजकारण बाजूला ठेवावे आणि समाजाला न्याय द्यावा, असे आवाहन संभाजीराजेंनी केले आहे.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यातून मार्ग काढतील
सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याची तारीख ४ जून आहे. सर्वोच्च न्यायालयाने ती वाढवली आहे. त्यामुळे अहवाल द्यायची तारीख सुद्धा पुढे गेली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मार्ग काढू असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीरपणे सांगितले आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नक्कीच यातून मार्ग काढतील, असा विश्वास संभाजीराजेंनी यावेळी व्यक्त केला.
तुम्हाला वास्तविकतेचं भान नाही; ‘कोविन’वरून सुप्रीम कोर्टाने केंद्राला सुनावले
मोदींवर नाराज असण्याचा प्रश्नच नाही
मोदींवर नाराज असण्याचा प्रश्नच नाही. त्यांनी मला नेहमीच सन्मान दिला आहे. राष्ट्रपतीनियुक्त खासदार म्हणून त्यांनी मला राज्यसभेत नेमले आहे. हे सगळे असले तरी एक खासदार म्हणून आमच्या भावना मांडणे चुकीचे नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत मत सांगण्याचा माझा प्रयत्न राहील, असे सांगत संभाजीराजे यांनी याप्रकरणी खुलासा केला.