आरकेंच्या कर्तृत्वाला सलाम
By Admin | Updated: November 7, 2014 04:04 IST2014-11-07T04:04:41+5:302014-11-07T04:04:41+5:30
स्वाक्षरी घेण्यासाठी लहान मुलांची उडालेली झुंबड... पुष्पगुच्छांचा वर्षाव... चॉकलेटचे ‘गिफ्ट्स’... आणि मान्यवरांनी अविस्मरणीय आठवणींना दिलेला

आरकेंच्या कर्तृत्वाला सलाम
पुणे : स्वाक्षरी घेण्यासाठी लहान मुलांची उडालेली झुंबड... पुष्पगुच्छांचा वर्षाव... चॉकलेटचे ‘गिफ्ट्स’... आणि मान्यवरांनी अविस्मरणीय आठवणींना दिलेला उजाळा... अशा उल्हासित वातावरणात एका ‘कॉमन मॅन’ला नायक बनविणाऱ्या जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांचा ९४वा वाढदिवस औंध येथील त्यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
गेली ५० वर्षे आपल्या कुंचल्यातून राजकीय, सामाजिक परिस्थितीवर व्यंगचित्रांच्या माध्यमातून भाष्य करीत वाचकांना आनंदाची पर्वणी देणाऱ्या आर.के. लक्ष्मण यांनी २४ आॅक्टोबरला ९५व्या वर्षात पदार्पण केले. त्याचे औचित्य साधून त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करण्यासाठी सरस्वती लायब्ररी, साहित्यवेध प्रतिष्ठान आणि आर.के.प्रेमी मंडळींच्या वतीने त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. आर.के. लक्ष्मण यांची पत्नी कमला यांच्यासह एमआयटीचे संस्थापक-अध्यक्ष विश्वनाथ कराड, कॉसमॉस बँंकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, ‘लोकमत’चे मुख्य संपादक विजय कुवळेकर, प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष सुनील महाजन यांच्या उपस्थितीत केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. एक माणूस म्हणून त्यांच्यात खूप चांगल्या गोष्टी पाहायला मिळतात, असे विजय कुवळेकर म्हणाले. या वेळी प्रा. विश्वनाथ कराड, कृष्णकांत गोयल, सुधीर गाडगीळ यांनीही मनोगत व्यक्त केले. तर आर.के. लक्ष्मण यांच्या कामाची जाण ठेवून त्यांच्या वाढदिवसादिनी प्रेमाचा जो वर्षाव झाला त्याबद्दल मी मनापासून ऋणी आहे, अशा भावना कमला लक्ष्मण यांनी व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)