शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
6
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
7
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
8
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
9
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
10
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
12
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
13
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
14
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
15
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
16
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
17
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
18
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
19
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
20
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

BLOG: देव मोठा की पैसा?... 'सेक्युलर' साईबाबांना 'रंग' का द्यायचा?

By सुधीर लंके | Updated: January 27, 2020 15:10 IST

साईबाबांचे जे तत्त्वज्ञान उपलब्ध आहे त्यात स्वत: साईबाबांनी आपले पूर्ण नाव काय, याचा कधी उल्लेख केलेला दिसत नाही.

ठळक मुद्देदेव व संतांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानापेक्षाही पैसा कमवून देणारी देवांची देवळे बहुधा समाजाला हवी आहेत. साईबाबा 1872च्या सुमारास शिर्डीत आले व 15 ऑक्टोबर 1918 रोजी त्यांचे महानिर्वाण झाले.स्वत: साईबाबांनी आपले पूर्ण नाव काय, याचा कधी उल्लेख केलेला दिसत नाही.

- सुधीर लंके

पाथरीचे ग्रामस्थ म्हणतात, साईबाबा आमच्या गावात जन्मले. बीडचे लोक म्हणतात, साईबाबांनी आमच्याकडे नोकरी केली.  धुपखेडा म्हणते, आमचे गाव साईंची प्रकटभूमी आहे. आणि शिर्डी तर साईबाबांना वाटून घ्यायला तयार नाही! - हे सारे अचानक का सुरू झाले असावे, याचे उत्तर शोधणे अजिबातच अवघड नाही देवांपेक्षा मंदिरांतील पैसा मोठा होऊ लागला आहे.  गावात मंदिर आले म्हणजे मागोमाग पैसा येतो, अशी गणिते गावोगावी घातली जात आहेत. आज साईबाबांचा प्रवास शोधला जात आहे,  उद्या प्रत्येक देवाने व संताने कोठून कोठे प्रवास केला,  त्याचा शोध घेतला जाईल.

..........

धर्म आणि आध्यात्मिक लढाईच्या मुळाशी संपत्ती आणि मालकी हक्काचाच वाद असतो हे शिर्डीवरून निर्माण झालेल्या वादाने पुन्हा एकदा सिद्ध केले. साईबाबा आमच्या गावात जन्मले होते म्हणून किंवा साईबाबा आमच्या गावात नोकरीला होते म्हणून शंभर कोटींचा निधी द्या या मागण्या हेच सांगतात. देव आले म्हणजे गावात पैसा येईल, अशी बहुधा गावांची धारणा झाली आहे. देव व संतांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानापेक्षाही पैसा कमवून देणारी देवांची देवळे बहुधा समाजाला हवी आहेत. साईबाबा कुठले, या वादाच्या मुळाशी हेच दिसते आहे.

शिर्डी येथे दीर्घकाळ वास्तव्यास असलेले व तेथेच समाधिस्त झालेले साईबाबा हे मूळ परभणी जिल्ह्यातील पाथरीचे असल्याचा दावा या ग्रामस्थांनी केला आहे. साईंचे जन्मस्थळ म्हणून पाथरीला शंभर कोटी रुपयांचा निधी द्या, अशीही मागणी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विकास निधीच्या घोषणेत पाथरीचा उल्लेख ‘साईबाबांचे जन्मस्थळ’ असा केला आणि त्यावरून वादंग निर्माण झाले. नंतर बरीच भवती न भवती झाली. आता मात्र शिर्डीकरांच्या विरोधामुळे व तसे ठोस पुरावेही समोर नसल्यामुळे सरकार पाथरीला साईजन्मभूमी घोषित करायला तयार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या वादाला अगोदर तोंड फोडले आणि पुढे या वादात पडण्यास नकारही दिला. त्यामुळे याबाबत आता न्यायालयात जाण्याचा इशारा पाथरीकरांनी दिला आहे. अयोध्येच्या रामजन्मभूमीचा मुद्दा वर्षानुवर्षे गाजला. तो वाद न्यायालयात पोहोचला. आता साईजन्मभूमीचा वादही त्याच वाटेने निघाला आहे.

साईबाबा 1872च्या सुमारास शिर्डीत आले व 15 ऑक्टोबर 1918 रोजी त्यांचे महानिर्वाण झाले. त्यांच्या नावाने शिर्डी आज जगभर ओळखली जाते. त्यांच्या समाधीलाही आता शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या समाधीचा शताब्दीउत्सवही साजरा झाला. साईबाबांच्या हयातीत व त्यांच्या निधनानंतर शंभर वर्षातही कधीच पाथरीकरांनी साईबाबा पाथरीचे आहेत असा दावा केला नाही. ते पाथरीचे असतील तर आपले गाव सोडून गेलेल्या या फकीर संताला परत गावी नेण्याचा प्रय} पाथरीने केलेला दिसत नाही. आज मात्र साईबाबा पाथरीकरांना हवे आहेत. तेही निव्वळ साईबाबा एकटे नव्हे, तर सरकारी मदतीसह हवेत. कारण साईबाबा आले की त्यांच्यामागे पैसा येतो हे तत्त्व आता पाथरीकरांनाही बहुधा उलगडले आहे. 2017 मध्ये शिर्डीत साईसमाधी शताब्दीचा प्रारंभ करताना राष्ट्रपती कोविंद यांनी पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थळ असल्याचा उल्लेख केला. तो त्यांनी कशाच्या आधारे केला हा प्रश्न अनुत्तरित आहे. मात्र, तेव्हापासून ही चर्चा सुरू झाली. उद्धव ठाकरे यांनी पाथरीला साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून निधी देण्याची घोषणा केल्यानंतर हा वाद आणखी उसळला.

साईबाबांचे जे तत्त्वज्ञान उपलब्ध आहे त्यात स्वत: साईबाबांनी आपले पूर्ण नाव काय, याचा कधी उल्लेख केलेला दिसत नाही. आपले गाव, जात, धर्म हे त्यांनी कधी सांगितले नाही. संतकवी दासगणू हे साईबाबांच्या सान्निध्यात राहायचे. 1936 साली साईभक्त नरसिंह स्वामींनी साईबाबांविषयी मुलाखत घेतली होती. धुळे न्यायालयाने साईबाबांची एका प्रकरणात साक्ष नोंदवली होती. त्या साक्षीचा किस्सा दासगणूंनी या मुलाखतीत नोंदवला आहे. तुमचे व वडिलांचे नाव काय? असा प्रश्न साईबाबांना विचारला गेला तेव्हा ‘साईबाबा’ एवढे एकच उत्तर त्यांनी दिले. आपला धर्म ‘कबीर’ व जात ‘परवरदिगार’ असल्याचे त्यांनी या साक्षीत सांगितले, असे संदर्भ आहेत. शिर्डी गॅझेटिअर या पुस्तकात ‘लोकमत’चे शिर्डी प्रतिनिधी प्रमोद आहेर यांनी हे सर्व संदर्भ नमूद केले आहेत. या साक्षीच्या कागदपत्रांचा शोध आता सुरू झाला आहे. मात्र, यात साईबाबांची एक भूमिका दिसते की ते आपले गाव, नाव, जात, धर्म अज्ञात ठेवत होते. अखेरपर्यंत ते त्यांनी जगासमोर येऊ दिले नाही. ते गूढ आहे.

‘सबका मालिक एक’अशी त्यांची धारणा होती. साईबाबा शिर्डीत आले तेव्हा ते मशिदीत राहायचे. या जागेला द्वारकामाई म्हटले जाते. त्यांच्या हयातीत शिर्डीत संदल सुरू झाली आणि रामनवमीही. एकाच दिवशी हे दोन्ही उत्सव साजरे होतात. त्यात हिंदू-मुस्लीम एकत्र असतात. मुस्लीम भक्त साईबाबांना पीर म्हणतात. नाताळात शिर्डीच्या मंदिरावर रोषणाई केली जाते. साईबाबांनी सर्व धर्मांबाबत आदर बाळगलेला दिसतो. त्यांचे हिंदू भक्त होते तसेच मुस्लीमही. साईबाबांचे जन्मस्थळ शोधणे म्हणजे त्यांचा जात-धर्म शोधण्याचा प्रकार आहे. साईंचे जन्मस्थळ शोधणे म्हणजे त्यांच्या तत्त्वज्ञानालाच फाटा देणे आहे. त्यांची स्वत:ची जी इच्छा होती त्या इच्छेविरुद्ध जाण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे साईबाबांचे जन्मस्थळ गूढ ठेवा, असा शिर्डीकरांचा आग्रह आहे.

पण, जन्मस्थळाचा वाद हा केवळ साईबाबांवरील श्रद्धेपुरता मर्यादित नाही. साईबाबा या नावामागे आता एक अर्थकारणही आहे. शिर्डी हे देशातील श्रीमंत देवस्थानांपैकी एक आहे. भाविकांच्या गर्दीत तर शिर्डी देशात क्रमांक एकवर आहे. 2 हजार 200 कोटींच्या ठेवी, 450 किलो सोने, 5550 किलो चांदी, 10 कोटींचे हिरे, पाच भक्तनिवास, एक प्रसादालय अशी मोठी मालमत्ता सध्या शिर्डी संस्थानकडे आहे. निव्वळ कर्मचारीच सहा हजार आहेत. दररोज 60 ते 65 हजार लोक शिर्डीला भेट देतात.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत एकदा शिर्डीत आले तेव्हा ते म्हणाले होते, गोव्यात दरवर्षी 60 ते 70 लाख पर्यटक येतात. तेवढय़ा पर्यटकांवर गोव्याची अर्थव्यवस्था चालते. शिर्डीला तर गोव्याच्या तिप्पट लोक येतात. मात्र त्या तुलनेत शिर्डीचा विलंबाने विकास झाला. 

साईबाबांमुळे शिर्डीला देशातील विविध भागांतून रेल्वे येऊ लागली. सध्या दररोज सरासरी चार रेल्वेगाड्या शिर्डीतून धावतात. विमानतळ आले. मुंबई, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, बंगलोर, नागपूर येथून शिर्डीला विमानसेवा सुरू झाली. औरंगाबादसारख्या विमानतळाला हे विमानतळ मागे टाकू लागले आहे. लवकरच शिर्डीतून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होतील. दररोज शंभरहून अधिक ट्रॅव्हल्सच्या गाड्या शिर्डीत येतात. 36 हजार लोकसंख्या असलेल्या शिर्डीत सातशेपेक्षा अधिक हॉटेल्स आहेत. आचार्य भारदद्वाज, नरसिंहस्वामी यांनी आंध्रमध्ये साईबाबांचा मोठा प्रचार, प्रसार केला आहे. त्यामुळे दक्षिणेकडील राज्यांकडून मोठय़ा संख्येने भाविक येतात. साईबाबांच्या हयातीतच त्यांना भेटण्यासाठी देशाच्या विविध भागातून भाविक येते होते. तो ओघ नंतरच्या काळात अधिक वाढत गेला व त्यातून शिर्डीची भरभराट झाली हे वास्तव आहे. 

आज शिर्डीचे बहुतांश अर्थकारण साई मंदिरावर उभे आहे. काही वर्षांपूर्वी साईबाबांना वाहिल्या जाणार्‍या पुष्पहारांची उलाढालच लाखो रुपयांची होती. झेंडू, गुलाब, गुलछडी, सब्जा असे आठ ते दहा टन हारांचे साहित्य दररोज शिर्डीत यायचे. त्यामुळे या फुलझाडांची शेतीच काही शेतकरी करायचे. आता हार वाहणे कमी झाले आहे. शिर्डीचे प्रसादालयही भव्य आहे. सध्या वर्षाकाठी चाळीस कोटींचा खर्च प्रसादालयावर होतो. यावर्षी प्रसादालयासाठी 31 कोटी रुपयांचे तूप खरेदी करण्याचे ठरले आहे. वर्षाकाठी साधारण साडेतीनशे कोटींची देणगी या संस्थानला मिळते. नगर जिल्हा नियोजन मंडळाने यावर्षी जिल्ह्याच्या 571 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली. दुसरीकडे साई संस्थानची वार्षिक उलाढाल सहाशे कोटी रुपयांची आहे. यावरून साई संस्थान आर्थिकदृष्ट्या किती महत्त्वाचे आहे हे लक्षात येते. 

साईबाबा नावाची ही जादू आहे. साईबाबांची जन्मभूमी म्हणून दुसरे एखादे ठिकाण विकसित झाल्यास साईबाबांच्या तत्त्वज्ञानाला बाधा तर पोहोचेलच; पण भाविकांची ‘वाटणी’ झाल्यास शिर्डीच्या अर्थव्यस्थेला धोका पोहोचू शकतो हीही भीती शिर्डीकरांना असू शकते. दुसरीकडे साईबाबांमुळे शिर्डीची भरभराट झाली तशी आपलीही होईल, असा एक आशावाद पाथरीसारख्या गावांचा असणार.

पाथरी, बीड शहर, औरंगाबाद जिल्ह्यातील धुपखेडा यांनी साईबाबांच्या नावाने निधी मागितला आहे. बीडकरांचे म्हणणे आहे, साईबाबांनी आमच्याकडे नोकरी केली. धुपखेडा म्हणते, आमचे गाव म्हणजे साईंची प्रकटभूमी आहे. आता शिर्डीच्या आसपासची गावेही साईबाबांच्या नावाने निधी मागू लागली आहेत. जगात सध्या जी मंदिरे निर्माण होत आहेत त्यात साईबाबांच्या मंदिरांची संख्या सर्वाधिक आहे. शिर्डीत अशा सर्व मंदिराच्या ट्रस्टींचे दोन वर्षांपूर्वी संमेलन झाले. त्यात दीड हजारहून अधिक मंदिरांचे विश्वस्त होते. खेडोपाडी पूर्वी गणपती, महादेव ही मंदिरे व्हायची. आता ती जागा साई मंदिरांनी घेतली आहे. साईमंदिरे का वाढताहेत याचे नेमके विश्लेषण अद्याप कुणी केलेले नाही. साईबाबा हे धर्मनिरपेक्ष संत म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या ‘सेक्युलर’ प्रतिमेमुळेही मंदिरांची संख्या कदाचित वाढत असल्याचा एक तर्क आहे. साईबाबांनी रुग्णसेवा, अन्नदान, गरिबांना मदत हे उपक्रम राबविले होते. हे उपक्रम शिर्डीसह विविध साई मंदिरांकडून सुरू आहेत हे आणखी एक वैशिष्ट्य आहे. 

गावांमध्ये तुम्ही तीर्थक्षेत्रांचे विकास आराखडे बनविणार असाल तर सरकार कोट्यवधी रुपये द्यायला तयार आहेत. म्हणजे मंदिरे बांधा आणि पैसा मिळवा असे एक नवे विकासाचे मॉडेल विकसित होऊ घातले आहे. गावात मंदिर येणार असेल तरच आपल्या गावात पैसा येईल अशी गावांची मानसिकता दिसते. 

‘देऊळ’ चित्रपटाची कहाणी साईजन्मभूमी वादाच्या निमित्ताने साक्षात प्रकटली आहे. ‘मंदिर’ हे विकासाचे मॉडेल आहे का, याचा धोरणात्मक निर्णय ठाकरे सरकारला घ्यावा लागेल. मध्यंतरी आमदार, खासदार निधीतून गावोगाव मंदिरांचे सभामंडप मोठय़ा प्रमाणांवर बांधले गेले. शाळेला इमारत नाही; पण, मंदिरासमोर सभामंडप आहे अशी एक विसंगती गावोगाव दिसली. नगर जिल्ह्यातील मोहटादेवी देवस्थानने तर भक्तांची भरभराट व्हावी म्हणून मंदिराच्या बांधकामात दोन किलो सोन्याची सुवर्णयंत्रे पुरली. विशेष म्हणजे या देवस्थानवर जिल्हा न्यायाधीश हे अध्यक्ष आहेत. अशापद्धतीने देवांपेक्षा मंदिरांतील पैसा मोठा होऊ लागला आहे. पाथरीच्या वादातही भक्तिभावापेक्षा पैसा हाच केंद्रस्थानी दिसतो. आज साईबाबांचा प्रवास शोधला जात आहे. उद्या प्रत्येक देवाने व संताने कोठून कोठे प्रवास केला, त्याचा शोध घेतला जाईल व त्या कारणाखाली मंदिरांसाठीचा विकास निधी मागण्याची मालिकाच सुरू होईल.  

‘सेक्युलर’साईबाबांना ‘रंग’ देण्याचा कावा?

साईबाबांनी ना कोणता धर्म मानला, ना कोणती जात! ते सर्वांचेच होते ! पण, साईबाबांची ही ‘सेक्युलर’ प्रतिमा काहीजणांना खटकत आहे का, हीदेखील शंका आता उपस्थित झाली आहे. शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी मध्यंतरी ‘साईबाबांची पूजा करायला नको, ते देव नाहीत’असे विधान केले होते. वास्तविक शंकराचार्यांनी अनेक मंदिरांत प्राणप्रतिष्ठा करून दगडी मूर्तींमध्ये देव ‘स्थापित’ केला. ते साईंना मात्र देवत्वाचा दर्जा द्यायला तयार नाहीत. शंकराचार्य साईबाबांचा तिरस्कार का करतात, याचा उलगडा झालेला नाही. हिंदू संघटनांनीही शंकराचार्यांना याबाबत फारसे प्रश्न केलेले नाहीत. साईबाबांची जी धर्मनिरपेक्ष प्रतिमा आहे ती शंकराचार्यांना खटकत आहे का, असाही एक प्रश्न त्यांच्या या विरोधामागे आहे.

मधल्या काळात शिर्डीच्या साईमंदिराच्या भगवीकरणाचाही मुद्दा चर्चेत आला. भाजप सरकारच्या काळात या मंदिरातील पाट्या भगव्या झाल्या. साईसमाधी शताब्दी उत्सवानिमित्त एक ध्वजस्तंभ उभारून त्यावर ओम आणि त्रिशूल बसविला गेला. साईमंदिराचे भगवेकरण करू नका, असा एक वाद त्यावेळीही उपस्थित झाला. त्यामुळे साईबाबांची ‘धर्मनिरपेक्ष बाबा’ अशी जी ओळख आहे ती पुसून त्यांचे भगवेकरण करण्याचा किंवा त्यांच्यावर कुठल्यातरी धर्माचा शिक्का मारण्याचा प्रयत्न सुरू आहे का, असाही एक वास या सर्व वादामागे आहे. 

साईंची कृपा

* 36 हजार लोकसंख्या असलेल्या शिर्डीत सातशेपेक्षा जास्त हॉटेल्स * दररोज 60 ते 65 हजार लोक शिर्डीला भेट देतात. *  साई संस्थानकडे 2 हजार 200 कोटींच्या ठेवी, 450 किलो सोने, 5550 किलो चांदी, 10 कोटीचे हिरे, पाच भक्तनिवास, एक प्रसादालय अशी मोठी मालमत्ता *  प्रसादालयावर वर्षाला चाळीस कोटींचा खर्च, यावर्षी  31 कोटी रुपयांचे तूप * वर्षाकाठी साधारण साडेतीनशे कोटींची देणगी* नगर जिल्ह्याचा विकास आराखडा 571 कोटी रुपयांचा; साई संस्थानची वार्षिक उलाढाल 600 कोटींची !

sudhir.lanke@lokmat.com(लेखक ‘लोकमत’च्या अहमदनगर आवृत्तीचे प्रमुख आहेत.) 

टॅग्स :shirdiशिर्डीsaibabaसाईबाबाSaibaba Mandirसाईबाबा मंदिरUddhav Thackerayउद्धव ठाकरेpathriपाथरी