‘सह्याद्री’त पाच वाघोबा !
By Admin | Updated: January 20, 2015 23:42 IST2015-01-20T22:06:40+5:302015-01-20T23:42:17+5:30
पाटणमध्ये नैसर्गिक कुरणे : वन्यजिवांची मांदियाळी अन् नवे पाणवठे

‘सह्याद्री’त पाच वाघोबा !
सातारा : देशभरातील वाघांची संख्या २२२६ इतकी झाली असताना त्यातील पाच वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात असल्याच्या शुभ वर्तमानावर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) शिक्कामोर्तब केले आहे. या क्षेत्रात कोयना आणि चांदोली अभयारण्यांचा समावेश होतो. यातील कोयना परिसरात यापूर्वी दोन ते तीन वाघांचे अस्तित्व स्पष्ट झाले होते.
‘एनटीसीए’मार्फत दर तीन वर्षांनी वाघांची संख्या मोजली जाते. यापूर्वी २०१० च्या अखेरीस मोजदाद झाली होती, तेव्हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प नव्यानेच आकाराला आलेला होता. त्यानंतर मे २०१४ मध्ये ‘एनटीसीए’च्या तीन सदस्यांच्या समितीने ‘सह्याद्री’ला भेट दिली. यावेळी वाघांचे अस्तित्व मान्य करण्यासाठीचे निकष अत्यंत कठीण होते. वाघाचे प्रत्यक्ष दर्शन आणि जमा केलेल्या नमुन्यांमधील केवळ ‘डीएनए’ वरच भरवसा ठेवला जाणार होता. ‘सह्याद्री’च्या प्रशासनाने ११ नमुने पाठविले होते. त्यावरून आणि पाहणीवरून या क्षेत्रात पाच वाघ असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पाटण तालुक्यातील पाच गावांचे पुनर्वसन झाल्यानंतर तेथील शेतजमिनीत नैसर्गिक कुरणे तयार करून त्यावर तृणभक्षी वन्यजीव चांगल्या प्रकारे पोसले जातील याची दक्षता घेण्यात आली. तसेच सागरेश्वर अभयारण्य आणि पुण्याच्या राजीव गांधी उद्यानातून २० सांबर आणि चितळ आणून या भागात सोडण्यात आली. भविष्यात ही संख्या २०० पर्यंत वाढविण्यात येणार असल्याने वाघोबांना भरपूर भक्ष्य उपलब्ध होणार आहे. वाघांसाठी नवे पाणवठेही तयार केले जात आहेत.
‘सह्याद्री’च्या व्यवस्थापनाबद्दल मागील वेळेपेक्षा अव्वल गुणांकन यावेळी प्राप्त झाले आहे. एकंदर ४७ निकष त्यासाठी लावण्यात आले. सर्वसाधारण व्यवस्थापन, पुनर्वसन, संयुक्त वनव्यवस्थापन, पायाभूत सुविधांचा विकास, कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण, पर्यटन सुविधांमध्ये वाढ, असे हे निकष आहेत. (प्रतिनिधी)
वाघांचे भक्ष्य वाढविण्याबरोबरच मानव-वन्यजीव संघर्ष टाळणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने जावळी तालुक्यातील सात गावांचे पुनर्वसन प्रस्तावित असून, क्षेत्र निवड पूर्ण झाली आहे. बफर झोनमध्ये परिस्थितीचा विकास करून संतुलन राखले जाईल.
- एम. एम. पंडितराव,
उपवनसंरक्षक (वन्यजीव), सह्याद्री व्याघ्र प्रकल्प