मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यावर अधिकृत शिक्कामोर्तब; सदानंद मोरेंची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 14:52 IST2025-01-08T14:52:03+5:302025-01-08T14:52:03+5:30
Marathi Language News: अखेरीस मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा केंद्र सरकारचा शासन निर्णय जारी झाला आहे.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यावर अधिकृत शिक्कामोर्तब; सदानंद मोरेंची पहिली प्रतिक्रिया
Marathi Language News: अखेरीस मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा केंद्र सरकारचा शासन निर्णय जारी झाला आहे. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या मागणीची दखल घेत केंद्र सरकारने ०३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घेण्यात आलेल्या निर्णयाचा शासन आदेश तीन महिने लोटले तरी निघाला नसल्याने निर्णयाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते राज्य सरकारमधील मंत्री उदय सामंत यांनी हा शासन आदेश स्वीकारला. त्यामुळे आता मराठी भाषा ही अधिकृतपणे अभिजात भाषा ठरली आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उदय सामंत म्हणाले की, अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जे काही लाभ मिळतात, ते मिळवण्यासाठी आम्ही तातडीने प्रस्ताव सादर करणार आहोत. केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांच्या हस्ते मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणारा शासन निर्णय स्वीकारल्यानंतर उदय सामंत यांनी महाराष्ट्रातील जनतेच्यावतीने तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचे आभार मानले.
ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांनी दिली प्रतिक्रिया
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा केंद्र सरकारचा शासन निर्णय आल्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेसाठी कार्य करत आहे. गर्जा महाराष्ट्र ही लेखमाला लिहिली. या भाषेला २ ते अडीच हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. महाराष्ट्र प्राकृतचा प्रभाव संस्कृत साहित्यावर पडला आहे. महाराष्ट्र प्राकृत आणि मराठी भाषा यासाठी कार्य करणे आता शक्य होणार आहे. मराठी भाषेची आधीची आवृत्ती आहे, ज्याला प्राकृत म्हटले जाते, तिलाही आभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही समाधानाची बाब आहे, असे सदानंद मोरे म्हणालेत.
दरम्यान, मराठी भाषेतील काम साहित्यिकांना विश्वासात घेऊन केले जाईल. साहित्य संमेलनाला २ कोटींचा निधी देण्याचा निर्णय मागच्या वर्षी घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे यावर्षीही तो निधी देण्यात येईल. दिल्ली आणि अन्य भागात मराठी शाळा आहेत. त्या शाळा सुदृढ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करणार आहोत. योगायोग म्हणजे ११ वर्षांपूर्वी जेव्हा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून जो प्रस्ताव पाठवण्यात आला, त्यावेळी मी राज्यातील मराठी भाषेचा पहिला राज्यमंत्री होतो. तर आज देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मराठी भाषेचा कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर हा शासन निर्णय माझ्या हातात आणण्याचे भाग्य नियतीने लिहून ठेवलेले होते. म्हणून आता आमची जबाबदारी वाढलेली आहे, असे मला वाटते, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.