रस्तेदुरुस्तीला मुहूर्त
By Admin | Updated: July 20, 2016 04:26 IST2016-07-20T04:26:14+5:302016-07-20T04:26:14+5:30
शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ते’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले

रस्तेदुरुस्तीला मुहूर्त
टिटवाळा : शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ते’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत कल्याण-डोंबिवली महापालिकेने त्यांच्या हद्दीतील रस्त्यांची दुरुस्ती सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
केडीएमसी हद्द व कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था सध्या अतिशय दयनीय आहे. त्यात मांडा येथील पोलीस ठाणे ते सांगोडा रोड स्मशानभूमी रस्ता, निमकरनाका ते शिवसेना शाखा आनंद दिघे मार्ग, सावरकरनगर ते नांदप रोड, इंदिरानगर ते स्मशानभूमी रोड, गणेशनगर ते हरिओम व्हॅली रस्ता, जावईपाडा रोड आदी महापालिका हद्दीतील तसेच राया ते खडवली रस्ता, रुंदे ते फळेगाव रोड, उशीद-पळसोली-काकडपाडा-गेरसे रस्ता, कोलिंब ते दहागाव रोड आदी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे.
केडीएमसीने याची दखल घेऊन तत्काळ टिटवाळा येथील निमकरनाका ते शिवसेना शाखा आनंद दिघे मार्गावरील दुरुस्तीला सुरुवात झाली आहे.