प्रदीप जैस्वालांबाबत 'ती' अफवा आणि...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 14:54 IST2019-10-27T14:48:16+5:302019-10-27T14:54:40+5:30
जैस्वाल यांना रात्रीपासून कार्यकर्त्यांचे आणि हितचिंतकांचे फोन सुरु

प्रदीप जैस्वालांबाबत 'ती' अफवा आणि...
मुंबई : औरंगाबाद मध्य मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांची प्रकृती ठीक नसून त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरु असल्याची चर्चा रात्रीपासून औरंगाबाद जिल्ह्यात सुरु असल्याने शिवसैनिक व प्रदीप जैस्वाल यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत होते. मात्र ही फक्त अफवा असून, माझी प्रकृती अत्यंत उत्तम व ठणठणठणीत असल्याचा खुलासा प्रदीप जैस्वाल यांनी केला आहे.
नुकतेच औरंगाबाद मध्य मतदारसंघातून निवडून आलेले प्रदीप जैस्वाल यांच्याबाबत कुणीतरी खोडसाळ पणाने, ते आजारी असल्याची अफवा शहरात पसरवली. त्यांनतर जैस्वाल यांना रात्रीपासून कार्यकर्त्यांचे आणि हितचिंतकांचे फोन सुरु असून, आतापर्यंत 500 पेक्षा अधिका लोकांनी त्यांना फोन केला असल्याचे जैस्वाल म्हणाले.
जैस्वाल यांनी आपल्या फेसबुक पेजवरून एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यात त्यांनी खुलासा केला आहे की, मी आजारी असल्याचे आणि माझी प्रकृती ठीक नसल्याने मुंबईत उपचार सुरु असल्याची कुणीतरी शहरात अफवा पसरवली आहे. मात्र मी सर्वांना विनंती करतो की, या अफवांवर विश्वास ठेवू नका. माझी प्रकृती आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने अत्यंत उत्तम व ठणठणीत असल्याचे जैस्वाल म्हणाले.