बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 21:33 IST2025-10-22T21:27:33+5:302025-10-22T21:33:10+5:30
एकाच घरात १७०० मतदार आहेत. साडे तीन लाख मतदार तपासले. काही घरांचा शोध घेतला, तिथे पत्तेच अस्तित्वात नाही. चुकीच्या पद्धतीने ही मतदार यादी जाहीर झाली असा आरोप सतीश चव्हाण यांनी केला.

बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
छत्रपती संभाजीनगर - मागील काही दिवसांपासून राज्यात बोगस मतदार नोंदणीवरून विरोधकांनी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मात्र यावरून भाजपा नेते विरोधकांवर फेक नॅरेटिव्ह तयार करत असल्याचा आरोप केला. परंतु आता सत्ताधारी पक्षातील आमदार सतीश चव्हाण यांनी धक्कादायक आरोप करत बोगस नोंदणीविरोधात कोर्टाकडे धाव घेतली आहे.
याबाबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण म्हणाले की, गंगापूर मतदारसंघात साडे तीन लाख मतदार विधानसभेवेळी होती. निवडणूक आयोगाने हीच यादी जिल्हा परिषद, नगरपालिकांना वापरायची असा निर्णय घेतला. या यादीबाबत जेव्हा कार्यकर्त्यांनी तपासणी केली तेव्हा त्यात दुबार नावे आढळली, एकाच पत्त्यावर हजारो मतदारांची नोंद आहे. जी घरे अस्तित्वात नाहीत त्यावरही शेकडो मतदारांची नोंद आहे. ही पूर्ण यादी आम्ही तपासली तेव्हा त्यात अनेक त्रुटी आढळल्या. एकाच घरात १७०० मतदार आहेत. साडे तीन लाख मतदार तपासले. काही घरांचा शोध घेतला, तिथे पत्तेच अस्तित्वात नाही. चुकीच्या पद्धतीने ही मतदार यादी जाहीर झाली. जर हीच यादी जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत वापरली तर खऱ्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होईल असा आरोप त्यांनी केला.
तसेच आम्ही निवडणूक आयोगाकडे ही यादी पुन्हा तपासावी असा अर्ज दिला आहे. चुकीच्या पद्धतीने ज्या मतदारांची नोंदणी केली आहे त्या मतदारांना यादीतून वगळावे अन्यथा आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्याशिवाय पर्याय राहणार नाही. निवडणूक आयोगाचं काम निवडणूक पारदर्शक घेणे आहे. गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यातील मतदारसंघात मतदार याद्या तपासणी करावी. ज्या मतदारांची नावे दुबार, तिबार आहेत त्यांचे मतदान कार्ड नंबरही वेगवेगळे आहेत. एकाच व्यक्तीच्या नावाने ३ वेगवेगळी कार्ड आहेत. संघटित गुन्हेगारीसारखे हे सर्व काम केले आहे. महसूल प्रशासन, पोलीस खाते यांची मदत घेऊन शोध घेतला पाहिजे. हजारो बोगस मतदान कार्ड तयार करण्यात आली आहेत असा आरोप आमदार सतीश चव्हाण यांनी केला.
दरम्यान, एकाच व्यक्तीच्या नावे वेगवेगळ्या नंबरने कार्ड दिले आहेत. काही मतदार सापडतही नाही. काल्पनिक मतदार यादीत भरलेत. आमचे कार्यकर्ते या याद्या तपासत आहेत. ३६ हजार दुबार नावे यादीत समाविष्ट आहेत. प्रशासनाने त्यांचे काम सुरळीत पार पाडावे. निवडणूक आयोगाने त्यावर बोलले पाहिजे. निवडणूक आयोग यांच्याकडून न्याय मिळाला नाही तर कोर्टात जावे लागेल. बोगस मतदारांमुळे चांगले उमेदवार मागे पडणार असतील तर त्याविरोधात बोलले पाहिजे असंही आमदार सतीश चव्हाण यांनी म्हटले.