भाजप मंत्र्यांसोबत संघाची बैठक, अजेंडा सांगितला, अंमलबजावणीचा आग्रह
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 09:26 IST2025-01-19T09:25:44+5:302025-01-19T09:26:29+5:30
संघाच्या येथील यशवंत भवन या कार्यालयात ही बैठक सुरू असून पुढील पाच वर्षात संघाच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत हे मंत्र्यांना बैठकीमध्ये सांगण्यात आले.

भाजप मंत्र्यांसोबत संघाची बैठक, अजेंडा सांगितला, अंमलबजावणीचा आग्रह
मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील मंत्र्यांची दोन दिवसांची बैठक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घेत असून तिला शनिवारपासून सुरू झाली. आजच्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील आशिष शेलार, नितेश राणे आधी उपस्थित होते. अन्य मंत्र्यांसोबत रविवारी बैठक होणार आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या मोठ्या विजयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्त्वाची भूमिका राहिली होती. त्यामुळेच आता भाजपच्या नेतृत्वात सरकार आलेले असताना राज्य सरकारबाबत आपला अजेंडा संघ पदाधिकाऱ्यांनी तयार केला असून त्याबाबत बैठकीत मंत्र्यांना सांगण्यात आले, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
संघाच्या येथील यशवंत भवन या कार्यालयात ही बैठक सुरू असून पुढील पाच वर्षात संघाच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत हे मंत्र्यांना बैठकीमध्ये सांगण्यात आले.
स्वतंत्र व्यवस्था
सूत्रांनी सांगितले, की भाजपाच्या मंत्र्यांनी आपली प्रतिमा चांगली राखलीच पाहिजे असा आग्रह यावेळी संघातर्फे करण्यात आला तसेच संघ आणि परिवारातील संघटनांची सार्वजनिक हिताची कामे अग्रक्रमाने व्हावीत यासाठी मंत्री कार्यालयात स्वतंत्र व्यवस्था असावी किंवा विशिष्ट व्यक्तीला त्याची जबाबदारी दिली जावी, असेही सांगण्यात आले.