"अखंड भारत कधीपर्यंत पाहता येईल?"; सरसंघचालक मोहन भागवतांनी दिलं रोखठोक उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 09:02 IST2023-09-07T09:02:00+5:302023-09-07T09:02:47+5:30
विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात विचारण्यात आला होता अखंड भारताबद्दलचा प्रश्न

"अखंड भारत कधीपर्यंत पाहता येईल?"; सरसंघचालक मोहन भागवतांनी दिलं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat, Akhand Bharat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांचे अखंड भारताबाबत मोठे वक्तव्य समोर आले आहे. देशाची परिस्थिती बदलत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारतापासून वेगळे झालेल्या देशांना त्यांची चूक कळत असून त्यांना पुन्हा भारतात सामील व्हायचे आहे, असा दावा त्यांनी केला. एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना भागवत म्हणाले की, देश अखंड भारत कधी बनेल हे मी सांगू शकत नाही, पण म्हातारे होण्यापूर्वीच दिसेल. नागपूरच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला.
अखंड भारत कधी निर्माण होणार?
वसतिगृहातील एका विद्यार्थ्याने भागवतांना विचारले की, भारत देशाला अखंड भारत म्हणून कधी बघता येणार आहे. त्यावर उत्तर देताना भागवत म्हणाले, 'नक्की कधीपर्यंत ते मी आता सांगू शकत नाही. त्यासाठी आपल्याला ग्रहज्योतिष पाहावे लागेल. मी प्राण्यांचा डॉक्टर आहे. पण मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही आतापासून विचार केलात तर तुम्ही म्हातारे होण्यापूर्वी तुम्हाला ते दिसेल.'
#WATCH | Nagpur, Maharashtra: On 'Akhand Bharat', RSS chief Mohan Bhagwat says, "...Those who separated from Bharat feel they have made a mistake...Bharat hona yani Bharat ke swabhav ko svikar karna..." pic.twitter.com/zc7kj1KU4Q
— ANI (@ANI) September 6, 2023
'विभक्त देशांना भारतात सामील व्हायचे आहे'
"देशातील परिस्थिती असे वळण घेत आहे. भारतापासून वेगळे झालेल्यांना आपण चूक केली असे वाटते. पुन्हा भारतात सामील व्हावे अशी त्यांची इच्छा आहे. पण पुन्हा भारत बनणे म्हणजे नकाशावरील रेषा संपवणे, असे त्यांचे मत आहे. मी असे मानत नाही, कारण ते तसे होणार नाही. भारत असणे म्हणजे भारताचे स्वरूप स्वीकारणे. भारताचा स्वभाव मान्य नव्हता, त्यामुळे अखंड भारताचे तुकडे करण्यात आले. हा स्वभाव परत आल्यावर संपूर्ण भारत एक होईल. सर्व शेजारी देशांना त्यांच्या जीवनातून हे शिकावे लागेल. हे काम आपल्याला करायचे आहे आणि ते आपण करत आहोत. आम्ही मालदीवला पाणी पोहोचवतो, श्रीलंकेला पैसे पोहोचवतो, भूकंपात नेपाळला मदत करतो, बांगलादेशला मदत करतो. सगळ्यांना मदत करतो," असा उल्लेख त्यांनी केला.
'भारत हा दक्षिण आशियाई देशाचा एक भाग आहे'
भागवत एक किस्सा सांगताना म्हणाले की, 1992-93 मध्ये सार्कचे अध्यक्ष असताना श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष प्रेमदासा म्हणाले होते की, जगातील मोठे देश लहान देशांना गिळंकृत करतात. म्हणूनच आपण सर्वांनी सावध राहून संघटित व्हायला हवे. दक्षिण आशियातील देशांसाठी हे अवघड काम नाही. आज आपल्याला जगात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते, पण प्रत्यक्षात आपण एकाच भूमीचे, भारताचे मुख्य भाग आहोत. भारत ही माझी आई आहे, मी तिचा मुलगा आहे, असा हा भाग निर्माण झाला आहे. आपले पूर्वज एकच आहेत. ज्या मूल्यांवर आपली संस्कृती उभी आहे ती सर्वत्र सारखीच आहेत," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.