१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 14:11 IST2025-05-13T14:11:19+5:302025-05-13T14:11:51+5:30
नागपूर येथे माहेरी असणाऱ्या रोशनी चौधरी यांचा १० मे रोजी वाढदिवस होता. नागपूरला आई वडील, लहान बहिणीने केक कापून हा वाढदिवस साजरा केला.

१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
धुळे - नागपूर येथील खदानीत पाय घसरून पडल्याने झालेल्या दुर्घटनेत ५ निष्पाप जीवांचा बळी गेला. त्यातील ३ जण धुळ्यातील असल्याचे कळल्यावर लक्ष्मीनगर परिसरात शोककळा पसरली. या मृतांमध्ये ३२ वर्षीय रोशनी चौधरी, त्यांचा १० वर्षीय मुलगा मोहित आणि ८ वर्षाची मुलगी लक्ष्मी यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. रोशनी यांचे माहेर नागपूरचे आहे. त्यांचे पती चंद्रकांत चौधरी हे पारोळा रोडवरील लक्ष्मी कॉलनीत वास्तव्यास आहेत. ते खासगी बांधकाम साहित्य विक्रीच्या दुकानात कार्यरत आहेत.
१२ वर्षापूर्वी चंद्रकांत आणि रोशनी यांचा विवाह झाला होता. त्यांची दोन्ही मुले मोहित आणि लक्ष्मी अभय विद्यालयात शिक्षण घेत होती. सुट्ट्यांमध्ये मुलांना सोबत घेऊन रोशनी माहेरी नागपूरात गेल्या होत्या. रविवारी रोशनी त्यांची लहान बहीण रजनी राऊत यांच्यासोबत २ मुलांना घेऊन खदान परिसरात गेल्या होत्या. त्यानंतर ही दुर्घटना घडली. अवघ्या ४ दिवसांपूर्वी चंद्रकांत चौधरी पत्नी आणि मुलांना भेटण्यासाठी गेले होते. मुलांची भेट घेऊन धुळ्यात परतल्यानंतर दोनच दिवसांत अपघाती मृत्यूची बातमी ऐकून त्यांच्या दु:खाला पारावार राहिला नाही. ही भेट त्यांच्यासाठी अखेरची ठरली.
आई वडिलांसोबत वाढदिवस साजरा केला अन्...
नागपूर येथे माहेरी असणाऱ्या रोशनी चौधरी यांचा १० मे रोजी वाढदिवस होता. नागपूरला आई वडील, लहान बहिणीने केक कापून हा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो व्हॉट्सअपला स्टेटसला ठेवले. या वाढदिवशी अनेकांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या. परिसरातील लोक, नातेवाईकही केक कापायला आले होते. मात्र माहेरी गेलेल्या रोशनी यांचा आई-वडील आणि बहिणीसह हा शेवटचा वाढदिवस ठरला. कारण दुसऱ्याच दिवशी रोशनी यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, मनमिळाऊ स्वभावाने परिचित असलेल्या रोशनी आणि त्यांच्या दोघा मुलांच्या मृत्यूची बातमी कळताच सासू सासऱ्यांनी एकच हंबरडा फोडला. घटनेची माहिती परिसरात कळताच शेजाऱ्यांनी घराबाहेर गर्दी केली. हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दुपारी ३ च्या सुमारास पती चंद्रकांत आणि त्यांचे भाऊ पंकज चौधरी तातडीने नागपूरसाठी रवाना झाले.