प्रेमाचा 'गुलाब' ५० रुपयांना अन् खायचा 'गुलाब' ५० पैशांना; जगाच्या पोशिंद्याने उभ्या पिकात शेळ्या-मेंढ्या सोडून दिल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 12:20 IST2025-02-12T12:20:17+5:302025-02-12T12:20:34+5:30

Farmer Cabbage Rate Down: शेतकऱ्यांची मुले शहरात छोट्या मोठ्या नोकऱ्या करू लागली आहेत. भविष्यात शेतकरी दिसेल का, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती येऊन ठेपलेली आहे. अनेक ठिकाणी गावातील शेते ओस पडू लागली आहेत.

'Rose' of love for 50 rupees and 'Cabbage ' for 50 paise; The world's food source left goats and sheep in the standing crop | प्रेमाचा 'गुलाब' ५० रुपयांना अन् खायचा 'गुलाब' ५० पैशांना; जगाच्या पोशिंद्याने उभ्या पिकात शेळ्या-मेंढ्या सोडून दिल्या

प्रेमाचा 'गुलाब' ५० रुपयांना अन् खायचा 'गुलाब' ५० पैशांना; जगाच्या पोशिंद्याने उभ्या पिकात शेळ्या-मेंढ्या सोडून दिल्या

जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला शेतकरी म्हणून जगणे खूप कठीण झाले आहे. शेतमालाला भाव नाही, महागाई गगणाला भिडलेली. यात वेगवेगळ्या रोगांची धाड, त्यात निसर्ग कोपलेला. अशा अनेक दुष्टचक्रात हा शेतकरी अडकलेला आहे. या शेतकऱ्यांची मुले शहरात छोट्या मोठ्या नोकऱ्या करू लागली आहेत. भविष्यात शेतकरी दिसेल का, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती येऊन ठेपलेली आहे. अनेक ठिकाणी गावातील शेते ओस पडू लागली आहेत. आजचाच विषय घ्यायचा झाला तर पत्ताकोबीला ५० पैसे प्रतिकिलोचा दर मिळाल्याने शेतकऱ्याने उभ्या पिकात शेळ्या-मेंढ्या चरण्यासाठी सोडून दिल्या आहेत. तर दुसरीकडे व्हॅलेंटाईन आठवड्यानिमित्त गुलाबाच्या फुलाला प्रति फुल ५० रुपयांचा दर आला आहे. 

किती विदारक परिस्थिती सध्या शेतकऱ्यावर ओढविली आहे, याचे हे जिवंत उदाहरण आहे. काही लोक म्हणतात आधुनिक शेती करा, सिझननुसार उत्पादन घ्या. परंतू या शेतकऱ्यांना कोणते उत्पादन घ्यावे हे सांगायला देखील कोणी नसतो. त्याला जसे समजते, तसेच तो उत्पादन घेतो आणि फसतो. जेव्हा एखाद्या भाजीपाल्याची टंचाई होते तेव्हा त्याला दर मिळतो. यासाठी काहीसे लक आणि वेळ या शेतकऱ्याच्या बाजुने असावी लागते, तरच हे होते. 

येवला तालुक्यातील विखरणी येथील शेतकरी गोरख शेलार यांनी आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये 25 हजार रुपये खर्च करून कोबी पिकाची लागवड केली होती. भाजीपाल्याला शहरात मोठी मागणी असते. कोबीचा वापर चायनिजच्या गाड्यांवर प्लेटमधील सजावटीसाठी व खाण्यासाठी केला जातो. घरातही कोबीची भाजी केली जाते. याच कोबीला जेव्हा शेलार यांना ५० पैसे प्रति किलोचा दर आहे, हे बाजारात माल नेल्यावर समजले तेव्हा त्यांनी त्या २५ हजारांवर आणि अपेक्षा केलेल्या उत्पन्नावर पाणी सोडले. उद्विग्न होत या शेतकऱ्याने या पिकात शेळ्या मेंढ्या चरविल्या आहेत. 

तर दुसरीकडे पंढरपूरच्या शेतकऱ्याने गुलाबाची लागवड केली होती. इतर वेळी या गुलाबाला १०-१५ रुपयांचा पेंडीचा दर असतो. तो आता पन्नास रुपयांवर गेला आहे. खायचा 'फुलकोबी' ५० पैशांना आणि प्रेमाचा 'गुलाब' ५० रुपयांना ही दरी या शेतकऱ्यांच्या काळजात धस् करणारी आहे. 

Web Title: 'Rose' of love for 50 rupees and 'Cabbage ' for 50 paise; The world's food source left goats and sheep in the standing crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी