लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळ्याप्रकरणी ईडीने बुधवारी दाखल केलेल्या नव्या आरोपपत्रात शरद पवार गटाचे नेते व आमदार रोहित पवार यांचे नाव आहे. मात्र, विशेष पीएमएलए न्यायालयाने त्याची दखल घेतली नाही.
या प्रकरणात रोहित यांची २०२४ मध्ये ईडीने चौकशी केली होती. या प्रकरणात जानेवारी २०२४ मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कोणताही गुन्हा सिद्ध होत नसल्याचे स्पष्ट करत क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि पुतणे रोहित पवार यांनी कोणताही फौजदारी गुन्हा केला नसल्याचे रिपोर्टमध्ये नमूद होते. हा रिपोर्ट अद्याप न्यायालयाने स्वीकारलेला नाही.
संघर्ष करणार : रोहित पवारईडीचे अधिकारी केवळ आदेशाचे धनी आहेत. पण, विचारांसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी तयारी आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली. दरम्यान, पूर्वीच्या आरोपपत्रात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, त्यांचे वडील प्रसाद तनपुरे, रणजीत देशमुख, सुबोध देशमुख, समीर सुळे, अर्जुन खोतकर आणि जुगल तपाडिया आदींची नावे आहेत.