Rohit Pawar on Gopichand Padalkar: सोलापुरात पूर्व राजकीय वैमनस्यातून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता असलेल्या शरणू हंडे याला घरासमोर मारहाण करत कारमध्ये घालून अपहरण केल्याची घटना गुरुवारी घडली. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करत आरोपींना कर्नाटकातील झळकी येथून सोलापुरात आणलं. याप्रकरणी अमित सुरवसे याच्यासह चौघांना ताब्यात घेण्यात आलं. मात्र या प्रकरणावरुन गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार मास्टरमाईंड असल्याचा आरोप केला. दुसरीकडे रोहित पवार यांनी हे आरोप फेटाळून लावत याप्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली आहे.
शरणू हंडे साईनगरमधील एका बियर शॉपी परिसरात थांबलेले असताना चार ते पाच जण अचानक आले आणि त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांना कारमध्ये जबरदस्तीने बसवून पळवून नेले. आरोपींनी अपहरण केल्यानंतर हंडेला कर्नाटकडे नेले. मात्र पोलिसांनी पाठलाग करुन त्यांना पकडलं आणि शरणू हंडेला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर शुक्रवारी गोपीचंद पडळकर यांनी शरणू हंडेची भेट घेऊन चौकशी केली. अपहरण करणारा अमित सुरवसे हा रोहित पवारांचा समर्थक असून शरणू हांडे अपहरण-मारहाण प्रकरणात रोहित पवारच मास्टरमाईंड असल्याचा आरोप पडळकर यांनी केला. यावर बोलताना रोहित पवार यांनी गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरुन पडळकर तमाशा करत असल्याचे म्हटलं.
"सरकारच्या विरोधात मी मोठ्या प्रमाणावर पुराव्यासकट बोलत आहे. सरकारची मोठ्या प्रमाणात अडचण केली आहे. काल मी फोन केला असं ते कुठेतरी म्हणत आहेत. मी आधी छत्रपती संभाजीनगर नंतर वाशिम आणि आज अमरावतीमध्ये आहे. मी कुठेही कधी कोणाशी फोनवर बोललेलो नाही. मी माझ्या घरच्यांसोबत व्हिडिओ कॉल वर बोलत नाही. तर हा कोण लागून गेला आहे याच्या व्हिडिओ कॉलवर मी बोलायला. ज्या कार्यकर्त्याने चूक केली आहे त्यांच्या बाजूने आम्ही राहत नाही. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. तुमच्याकडे आता पोलीस प्रशासन आहे. गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरच पडळकर तिथे गेलेत आणि हा तमाशा करत आहेत. मला अडकवण्याचा प्रयत्न करत असाल तर एसआयटी नेमा आणि खरं काय ते लोकांसमोर आलं पाहिजे," असं रोहित पवार म्हणाले.
"कोणावर अन्याय झाला असेल, कोणाला मारहाण झाली असेल तर माझी सहानभूती त्या मुलाबरोबर आहे. तो आमच्या विरोधातला असला तरी चालेल. पण जर खोटं बोलून कोणी वेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असेल तुम्ही कितीही प्रयत्न करा मला त्यात अडकवू शकत नाही. कारण मी काही चूक केली नाही. मी सरकारच्या विरोधात बोलतच राहणार. तुम्हाला जी काही चौकशी करायची ती करा. पण कालच्या प्रकरणामध्ये उगाचच तुम्ही माझं नाव घेत आहात ते योग्य ठरत नाही," असंही रोहित पवार म्हणाले.