मुंबई - अजितदादांच्या निधनानंतर प्रसिद्धी मिळवण्यासाठी संजय राऊत आणि रोहित पवार रोज उठून तेच तेच मुद्दे मांडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. अपघातामागचे सत्य समोर आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकार अतिशय गांभीर्यपूर्वक प्रयत्न करत आहे. मात्र सत्य समोर आणतोय असा आव आणून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न राऊत आणि रोहित पवार करत आहेत असा घणाघात प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे.
प्रदेश कार्यालयात माध्यमांशी बोलताना बन यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला. नवनाथ बन म्हणाले की, केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार डीजीसीए स्तरावर अपघाताची चौकशी सुरूच आहे. सीबीआय चौकशीच्या केलेल्या मागणीवर देखील सकारात्मकरित्या विचार सुरू आहे. अपघात झाल्यानंतर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला जात नाही तर अपघाती मृत्यू अहवाल दाखल केला जातो. असा अहवाल यापूर्वीच दाखल झालेला आहे. अपघाताची चौकशी संबंधित यंत्रणा करत आहेत हे ही अनेकदा सरकारने सांगूनही रोहित पवार प्रसिद्धीसाठी उतावीळ झाले आहेत. त्यासाठीच मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्याचा बालहट्ट रोहित पवारांनी धरला असा टोला बन यांनी लगावला.
तसेच अजितदादांच्या अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स सुरक्षित असून त्याच्या माध्यमातून सत्य बाहेर येण्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा. रोहित पवारांच्या पुढाकाराने आता संजय राऊत राज्यसभेमध्ये हा मुद्दा उचलून तो मार्गी लावणार आहेत. शरद पवार राष्ट्रवादीचे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये खासदार असताना त्यांच्याऐवजी रोहित यांना संजय राऊतांची गरज का भासली? शरद पवार गटाच्या खासदारांना हा मुद्दा लोकसभा आणि राज्यसभेत उचलायला सांगण्याऐवजी प्रसिद्धीच्या हव्यासापायी रोहित हे रोज उठून पत्रकार परिषदांमधून बेफाम आरोप करत आहेत. स्टंटबाजीपेक्षा व्हीएसआर कंपनी संदर्भात असतील तर ते पुरावे तपास यंत्रणांना द्यावे असंही नवनाथ बन यांनी रोहित पवारांना म्हटलं आहे.
दरम्यान, अजितदादांची मविआमध्ये यायची इच्छा होती असे सांगणाऱ्या संजय राऊतांनाही बन यांनी चिमटा काढला. अजितदादांनी भाजपा महायुतीची साथ दिली. महायुती सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री होते. एनडीएमध्ये सामील झाले होते याचे भान संजय राऊतांनी ठेवावे. बाष्कळ दावे प्रतिदावे करण्यापेक्षा संजय राऊतांनी उबाठा गटाची प्रवक्तेगिरी बंद करून वेब सीरीजचे लेखन सुरू करावे, त्यांचा तो धंदा चांगला चालेल असा चिमटा नवनाथ बन यांनी राऊतांना काढला आहे.
Web Summary : BJP accuses Rohit Pawar and Sanjay Raut of publicity stunts regarding Ajit Pawar's plane crash. An investigation is ongoing, and they should provide evidence instead of making baseless allegations.
Web Summary : भाजपा ने अजित पवार के विमान हादसे पर रोहित पवार और संजय राउत पर प्रचार स्टंट का आरोप लगाया। जांच जारी है, उन्हें निराधार आरोप लगाने के बजाय सबूत देने चाहिए।