Rohit Arya: रोहित आर्याला मी वेगळे पैसे दिलेले, सरकारी बिलाशी संबंध नाही; दीपक केसरकरांची सारवासारव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 15:16 IST2025-10-31T15:15:09+5:302025-10-31T15:16:23+5:30
Rohit Arya, Deepak Kesarkar news: केसरकर यांनी मंत्री असताना रोहितला जर पैसे दिले असतील तर मग तो शिक्षण विभागाकडे कसले पैसे मागत होता, असा सवाल उपस्थित होत असताना केसरकर या प्रकरणाच्या केंद्रस्थानी येऊ लागले होते.

Rohit Arya: रोहित आर्याला मी वेगळे पैसे दिलेले, सरकारी बिलाशी संबंध नाही; दीपक केसरकरांची सारवासारव
मुंबई: ऑडिशनच्या नावाखाली बोलवत मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्या प्रकरणावर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा खुलासा आला आहे. रोहित आर्या शिक्षण विभागाकडून थकीत असलेल्या २ कोटी रुपयांच्या रकमेसाठी सर्वांचे उंबरे झिजवत होता. परंतू त्यास यश न आल्याने, घेतलेल्या कर्जाच्या व्याजाला कंटाळून त्याने मुलांना ओलीस ठेवण्याचे पाऊल उचलले होते. त्याच्या एन्काऊंटरनंतर केसरकर यांनी मी त्याला चेक दिला होता, असे वक्तव्य केले होते. यावर आता टीका होऊ लागताच केसरकर यांनी सारवासारव केली आहे.
रोहित आर्या याने केलेले काम चांगले होते आणि त्याचे कार्यक्रमही कौतुकास्पद होते, पण मुलांना ओलीस धरणे हे अत्यंत चुकीचे आहे आणि असे होता कामा नये, असे केसरकर म्हणाले. चकमकीत रोहित आर्या यांचा मृत्यू झाला याचे अतिशय दुःख आहे. माझ्यासाठी मुलांचा जीव सर्वात महत्त्वाचा आहे आणि सुदैवाने पोलिसांनी मुलांची सुरक्षित सुटका केली, असेही ते म्हणाले.
केसरकर यांनी मंत्री असताना रोहितला जर पैसे दिले असतील तर मग तो शिक्षण विभागाकडे कसले पैसे मागत होता, असा सवाल उपस्थित होत असताना केसरकर या प्रकरणाच्या केंद्रस्थानी येऊ लागले होते. यावर केसरकर यांना विचारले असता त्यांनी रोहित आर्याचे बिल उशिरा होत असल्याने सहानुभूती म्हणून आपण वैयक्तिक पातळीवर पैसे दिले होते. त्याचा आणि सरकारी बिलाचा काही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. परंतू केसरकर यांनी रोहितला किती रक्कम दिली तो आकडा मात्र गुलदस्त्यातच राहिला आहे.
शिक्षण विभागाने रोहित आर्याचे बिल बाकी ठेवल्याच्या आरोपावरही केसरकर यांनी खुलासा केला. आर्या यांनी थेट वेबसाइट काढून मुलांकडून पैसे घेतले होते. ते पैसे पालकांना परत करण्याची अट शिक्षण विभागाने घातली होती. आर्या यांनी त्या अटीचे पालन केले नाही, त्यामुळे त्यांचे बिल बाकी राहिले, असे ते म्हणाले.