डल्ला मारणाऱ्या पोलिसाचे घूमजाव
By Admin | Updated: August 1, 2016 04:45 IST2016-08-01T04:45:29+5:302016-08-01T04:45:29+5:30
१८ लाखांच्या मुद्देमालाचा अपहार केल्याचा आरोप असलेल्या रमजान तडवीला शनिवारी रात्री कुरार पोलिसांनी अटक केली.

डल्ला मारणाऱ्या पोलिसाचे घूमजाव
मुंबई : १८ लाखांच्या मुद्देमालाचा अपहार केल्याचा आरोप असलेल्या रमजान तडवीला शनिवारी रात्री कुरार पोलिसांनी अटक केली. मात्र, ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका त्याने घेतली असून, याबाबत तो योग्य ते सहकार्य करीत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
तडवी हा जळगाव या त्याच्या गावी फरार झाल्याची माहिती कुरार पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांचे एक पथक त्याच्या शोधार्थ जळगावला रवाना झाले. त्या ठिकाणी त्यांनी तडवीच्या मुसक्या आवळल्या आणि त्याला मुंबईत आणण्यात आले. त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले असता, ३ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे कुरार पोलिसांनी सांगितले.
‘मुद्देमालाला हातच लावला नाही, त्यामुळे ज्या ५१ वस्तू गायब झाल्यात, त्या घेतलेल्या नाहीत,’ असेच तडवी वारंवार तपास अधिकाऱ्यांना सांगत आहे. त्यामुळे जो ऐवज गायब झाला, त्याची काहीच माहिती मिळालेली नाही.