राज्यातील रस्ते खड्डेमुक्त होणार, १२९६ कोटींचा निधी मंजूर; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 13:50 IST2025-09-24T13:48:03+5:302025-09-24T13:50:50+5:30

दर्जेदार, सुरक्षित रस्त्याभोवती हरित पट्टा तयार करणार

Roads in the state will be made pothole-free with a fund of Rs 1296 crores Minister Shivendrasinh Raje Bhosale gave information | राज्यातील रस्ते खड्डेमुक्त होणार, १२९६ कोटींचा निधी मंजूर; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनी दिली माहिती

राज्यातील रस्ते खड्डेमुक्त होणार, १२९६ कोटींचा निधी मंजूर; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनी दिली माहिती

सातारा : सलग पाच महिन्यांत पडलेल्या धुवाधार पावसाने राज्यातील अनेक रस्त्यांची स्थिती खराब झाली आहे. या रस्त्यांची तातडीने देखभाल व दुरुस्तीची गरज आहे. त्यामुळे राज्य शासनाने रस्त्यांच्या वार्षिक देखभाल व दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत २०२५-२६ वर्षासाठी १ हजार २९६ कोटींच्या निधीस मंजुरी दिली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्रीशिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

या निधीच्या मंजुरीमुळे तातडीची दुरुस्तीची कामे तर होणारच आहेत, याशिवाय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कामांमध्ये पारदर्शकता आणली जाणार आहे. तसेच वृक्षारोपण व संवर्धन मोहिमेमुळे पर्यावरणपूरक विकासाला चालना मिळेल. खड्डेमुक्त, सुरक्षित आणि टिकाऊ रस्ते उपलब्ध होतील. प्रवासाचा वेळ, इंधनाची बचत आणि अपघातांची शक्यता कमी होईल. रस्त्यांच्या आजूबाजूला हरित पट्टा तयार होऊन पर्यावरण संतुलनही राखले जाईल, असे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.

वाचा- खड्ड्याने घेतला सहायक लेखाधिकाऱ्याचा बळी, सिंधुदुर्गमध्ये दुचाकी खड्ड्यात आदळून झाला अपघात

ते म्हणाले, रस्त्यांवरील खड्डे भरणे, तातडीची दुरुस्ती, पावसामुळे बाधित मार्गांची दुरुस्ती, तसेच पूरक कामे हाती घेण्यासाठी ही रक्कम उपयोगात आणली जाणार आहे. तर ४३ हजार किलोमीटर रस्त्यांवरील खड्डे टप्प्याटप्प्याने भरले जातील. यामुळे नागरिकांना सुस्थितीतील रस्त्यांवरून सुरक्षित प्रवास करणे सोयीस्कर होईल, असेही मंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी स्पष्ट केले.

राज्यातील एकूण आठ प्रादेशिक विभागांतर्गत येणाऱ्या सर्व जिल्ह्यांमधील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. कामांची गुणवत्ता तपासणे आणि मानकांचे पालन होणे, यावरही काटेकोरपणे लक्ष ठेवणार आहे. रस्त्यांची दुरुस्ती वेळेत व दर्जेदार होण्यासाठी शासनाने तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर एआय आधारित ॲप विकसित करण्यात आले. याच्या मदतीने रस्त्यांवरील खड्ड्यांचे स्थान, दुरुस्तीची स्थिती तसेच कामांची वास्तविक वेळेत तपासणी करणे शक्य होणार आहे. - शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री

Web Title: Roads in the state will be made pothole-free with a fund of Rs 1296 crores Minister Shivendrasinh Raje Bhosale gave information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.