रस्ते गुळगुळीत.. पण कालवे खडखडीत!
By Admin | Updated: May 1, 2015 00:16 IST2015-04-30T23:17:15+5:302015-05-01T00:16:26+5:30
महाराष्ट्र निर्मितीनंतरचा सातारा : रस्त्यांचे जाळे विणले, गावे एकमेकांना जोडली; पण जिव्हाळ्याच्या कैक पाणीयोजना मात्र रखडल्या--महाराष्ट्र दिन विशेष..

रस्ते गुळगुळीत.. पण कालवे खडखडीत!
दळणवळण वाढल्यानं विकासाला गती
सातारा : आज महाराष्ट्र दिन. १ मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. या घटनेला आज ५५ वर्षे पूर्ण झाली. या अर्धशतकात सातारा जिल्ह्याने काय कमावले आणि काय गमावले, याबाबत साखर कारखानदारी, पाणीयोजना, दळणवळण या घटकांचे सिंहावलोकन केले असता जिल्ह्याचा मुख्य आणि जिव्हाळ्याचा प्रश्न बनून राहिलेल्या पाणीयोजना निधीअभावी वर्षानुवर्षे रखडत पडलेल्या दिसतात. त्यांच्या खर्चात दुपटी-तिपटीने वाढ झालेली आहे. दळणवळणाच्या बाबतीत रस्त्यांचा विकास झपाट्याने झाला. गाव एकमेकांना जोडली; पण अजूनही अनेक गावांत पाणी पोहोचले नाही. महाराष्ट्रनिर्मितीनंतर साखर कारखानदारीत मोठा बदल झालेला दिसतो. आजमितीस जिल्ह्यात १२ साखर कारखाने असून एक-दोन वर्षांत आणखी नवीन कारखाने उभे राहणार आहेत.
संजय पाटील -कऱ्हाड
सातारा जिल्ह्याने आजपर्यंत अनेक स्थित्यंतरे पाहिली. बदल स्वीकारला. या बदलातूनच जिल्ह्याची नवी ओळख बनली. गेल्या काही वर्षात जिल्ह्याचा चेहरामोहरा बदललाय आणि या विकासासाठी दळणवळणाच्या वाढलेल्या सुविधा पोषक ठरल्यात.
उत्तरेला पुणे, पूर्वेला सोलापूर, दक्षिणेला सांगली, पश्चिमेला रत्नागिरी आणि त्यामध्ये असणारा जिल्हा म्हणजे सातारा. या जिल्ह्यात गेल्या पन्नास ते साठ वर्षात अनेक आमूलाग्र बदल झालेत. सर्वच क्षेत्रात जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. मुळात सातारा जिल्ह्याचा काही भाग सधन, संपन्न तर काही भाग दुष्काळी आहे. काही वर्षांपूर्वी जिल्ह्याचा विकासदर म्हणावा तेवढा नव्हता. जिल्ह्याला नैसर्गिक संपन्नता लाभलेली. मात्र, त्याचा योग्य वापर होत नव्हता. विकासाच्या दृष्टीने जिल्हा झेपावत असताना दळणवळणाच्या वाढलेल्या सुविधा त्यासाठी उपयुक्त ठरल्या. पुणे-बंगळूर या राष्ट्रीय मार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर वाहतुकीचा वेग वाढला. तसेच अनेक शहरे सातारा जिल्ह्याशी जोडली गेली. ग्रामीण भागातील कच्च्या रस्त्यांचे डांबरीकरण होऊन त्याची जागा पक्या रस्त्यांनी घेतली आहे.
कऱ्हाडला असणारे विमानतळही दळणवळणाच्यादृष्टीने जिल्ह्यासाठी महत्वाचे आहे. तसेच रेल्वेमार्गामुळेही जिल्हा अनेक शहरांशी जोडला गेला आहे. जिल्ह्यात सातारा, जरंडेश्वर, कोरेगाव, पळशी, रहीमतपूर, वाठार, तारगाव, आदर्की, लोणंद, मसूर, शिरवडे, कऱ्हाड याठिकाणी रेल्वे स्थानक आहेत. या स्थानकामुळे परिसराच्या कऱ्हाड, साताऱ्यासह अन्य शहरांच्या विकासाला चालना मिळाली आहे.
जिल्ह्यात वाढतेय साखर कारखानदारी..
संजय कदम - वाठार स्टेशन
विनासहकार नही उध्दार, हे सहकाराचे ब्रीद वाक्यच आता नामशेष झाले आहे. खासगीकरण झपाट्याने वाढू लागले आहे. १९५० मध्ये राज्याचा आर्थिक कणा बनलेल्या सहकारी कारखानदारीचा प्रारंभ वि. खे. पाटलांनी प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून केला. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर्, सांगलीनंतर आता सातारा जिल्ह्यात साखर कारखानदारीत लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्ह्यात सर्वात पहिल्यांदा साखरवाडी या गावात एक खासगी कारखाना सुरु झाला. आपटे मोफतलाल ग्रुपने या कारखान्याची सुरुवात १९३२ मध्ये केली. हाच कारखाना आज न्यु फलटण शुगर वर्क्स या नावाने कार्यरत आहे. यानंतर १९७०-७१ मध्ये सातारा, वाई, खंडाळा व कोरेगाव या चार तालुक्यांसाठी किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना कार्यरत झाला. यानंतर जिल्ह्यात श्रीराम फलटण, सह्याद्री, कृष्णा, रयत, जरंडेश्वर, लोकनेते बाळासाहेब देसाई, अजिंक्यतारा अशा सहकारी साखर कारखान्यांची सुरुवात झाली.
भविष्यात होणारे कारखाने
आगामी एक-दोन वर्षात खंडाळा तालुक्यात खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना तर फलटण तालुक्यात २ मोठे खासगी व कोरेगाव तालुक्यात १ खासगी असे १३ सहकारी व ७ खासगी कारखाने कार्यरत होणार आहेत. यामुळे आगामी २ वर्षात जवळपास २० साखर कारखाने जिल्ह्याच्या विकासाला गतिमान बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
कारखान्यांना
सहकार्याची गरज
वेगवेगळ्या साखर कारखान्यांच्या माध्यमातून आज जिल्ह्यातील लाखो लोकांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. मात्र जिल्ह्यात असलेली सहकारी चळवळ ही या पुढे कायम ठेवण्यासाठी या अडचणीतील साखर कारखान्यांना शासनाच्या आधाराची गरज आहे.
वसना-वांगणा योजना १५ वर्षांपासून रखडल्या
वााठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील कायम दुष्काळी क्षेत्रासाठी वसना पाणी उपसा सिंचन योजना तर तालुक्याच्या पूर्व व पश्चिम भागासाठी वांगणा उपसा सिंचन योजना या दोन स्वतंत्र पाणी योजनांचा एकत्रित भूमिपूजन समारंभ ९ मे २००० रोजी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते नांदवळ येथे झाला. आजही या दोन्ही योजना अनुशेषाच्या नावाखाली गेली पंधरा वर्षांपासून रखडल्या आहेत.
वसना योजना उत्तर भागातील रेवडी ते नांदवळ या दरम्यान दोन टप्यात कार्यरत होणार असून या योजनेचे काम युनिटी इन्फो प्रा. लि., मुंबई या कंपनीमार्फत सुरु असून आजपर्यंत पहिला व दुसऱ्या टप्प्यात मिळून एकूण ७८ कोटींची कामे पूर्ण झाली आहेत. या कामासाठी शासनाकडून ६० कोटी मिळाले असून झालेल्या कामाचे १८ कोटी व पुढील पूर्ण कामासाठी अजून ६० कोटी या प्रमाणे निधीची वेळेत तरतूद झाल्यास ही संपूर्ण योजना पुढील दीड वर्षात लोकार्पण होतील. मात्र चालू वर्षी या योजनेस केवळ ७ कोटींचीच तरतूद केल्याने ही योजना आता पुन्हा लांबणीवर पडणार आहे.
वांगणा उपसा सिंचन योजना पूर्ण होण्यासाठी ८० कोटींची गरज असून चालू आर्थिक वर्षात या योजनेला केवळ ८ कोटी निधी उपलब्ध केला असल्याने ही योजना ही लांबणीवर पडणार आहे. (वार्ताहर)
विमानतळाचे विस्तारीकरण
उद्योग वाढीस चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे कऱ्हाडचे विमानतळ विस्तारण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे. विमानतळाच्या या विस्तारीकरणाला विरोध होत असला तरी प्रत्यक्ष कार्यवाही सुरू असून भविष्यात विमानतळाचा विस्तार झाल्यास येथे उद्योग व्यवसाय वाढण्याची शक्यता आहे.
कऱ्हाड-चिपळूण रेल्वेमार्ग
कऱ्हाड-चिपळूण रेल्वेमार्गाचा सर्वात जास्त फायदा सातारा जिल्ह्याला होणार आहे. हा मार्ग उद्योगाला चालना देणारा ठरणार आहे. तसेच या मार्गावर कऱ्हाडला रेल्वेचे जंक्शन होणार असल्याने विकासाला गती मिळणार आहे.