खरीप हंगामातील भातपीक दुप्पट करणार
By Admin | Updated: May 7, 2017 06:14 IST2017-05-07T06:14:02+5:302017-05-07T06:14:02+5:30
कोकणातील ‘भात’ हे प्रमुख खरीप पीक आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२पर्यंत दुप्पट करण्याच्या उद्देशाने कृषी विभागाने केलेल्या

खरीप हंगामातील भातपीक दुप्पट करणार
विशेष प्रतिनिधी /लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : कोकणातील ‘भात’ हे प्रमुख खरीप पीक आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२पर्यंत दुप्पट करण्याच्या उद्देशाने कृषी विभागाने केलेल्या विशेष नियोजनानुसार २०१७-१८ पासून ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ वैशिष्ट्यपूर्ण संपूर्ण मोहीम राज्यात हाती घेण्यात येत आहे. त्या अंतर्गत ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ मोहीम राज्यात रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर म्हणजेच, २५ मे रोजी शुभारंभ होऊन ८ जूनपर्यंत राबविण्यात येणार आहे.
कोकणातील पाऊस लवकर सुरू होत असल्याने ही मोहीम महाराष्ट्र दिन १ मे ते १५ मे यादरम्यान राबविण्यात येत आहे. कोकणातील प्रमुख खरीप पीक भात उत्पादन २०२२पर्यंत दुप्पट करण्याचा संकल्प करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी पांडुरंग सिगेदार यांनी दिली.
कृषी उत्पादन खर्चात कपात करण्याच्या दृष्टीने व उत्पादन वाढविण्याकरिता शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. बियाणे, रासायनिक खते व कीड नाशके या निविष्ठांवरील खर्च व पिकांच्या पूर्व मशागतीपासून काढणी व मळणीपर्यंत मजुरीवर होणारा खर्चही प्रामुख्याने शेती उत्पादन खर्च वाढण्याची कारणे असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर लहरी हवामानामुळे पाऊस कमी झाल्याने किंवा वेळेवर न पडल्याने निर्माण होणाऱ्या स्थितीचा पिकांवर विपरीत परिणाम होत असल्याने शेतीतील जोखीम वाढत आहे. त्यासाठी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे.
भाताचे प्रमाणित बियाणे वापरल्यास शेतातील काही भाग पुढील हंगामासाठी स्वत:करिता बियाणे म्हणून वापरण्यासाठी राखून ठेवावा. मात्र, बियाण्यांसाठी राखून ठेवलेल्या क्षेत्रावरील पिकाची विशेष काळजी घ्यावी. एका हंगामात वापरलेल्या प्रमाणित बियाण्यांपासून तयार झालेले बियाणे पुढील दोन हंगामापर्यंत वापरावे, अशी महत्त्वाची सूचना करण्यात आली आहे.
भात रोपवाटिकेत बियाणे पेरणीपूर्वी बियाण्यास ३ टक्के मिठाच्या पाण्याची, थायरम (३ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास) तद्नंतर पीएसबी जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. या पद्धतीने भात लागवडीसाठी एका ठिकाणी एकच रोपाला वाढवायचे असल्याने रोपवाटिकेत ५ किलो प्रतिहेक्टर या प्रमाणात बियाणे पेरावे. चारसूत्री पद्धतीने भात लागवडीसाठी रोपवाटिकेत वाणाच्या प्रकारानुसार २० ते ३० किलो प्रतिहेक्टरी या प्रमाणात बियाणे पेरावे. रोहू पद्धतीने बियाणे मोड आणून पेरल्यास बियाणाची उगवण चांगली होते. भात रोपवाटिकेत रोपांचे किडी-रोगांपासून संरक्षण केल्यास पुनर्लागवडीनंतरच्या पीक संरक्षणावरील खर्चात बचत होते.
कोकणात भाताची पुनर्लागवड केली जाते. अशा ठिकाणी शेतकरी वा महिला गटांनी सामूहिक रोपवाटिका तयार कराव्यात. जेणे करून मजुरी व देखभाल खर्चामध्ये बचत होते. रोपांचे वय १२ ते १५ दिवसांचे असतानाच पुनर्लागवड पूर्ण करावी. अधिक वयाची रोपे लावल्यास रोपवाटिका व्यवस्थापनाचा खर्च वाढण्याबरोबरच फुटवे कमी आल्याने उत्पादनात घट होते. पूर्व मशागतीसाठी नांगरट व चिखलणीची कामेमिनी ट्रॅक्टर वा पॉवर टिलरद्वारे केल्यास मजुरी वाचते.
भातशेती नफ्यासाठी
विविध उपाययोजना
जमीन आरोग्य पत्रिकेतील शिफारशीनुसार खतांचा वापर केल्यास उत्पादनवाढीबरोबरच रासायनिक खतांवरील खर्चात बचत, लावणी किंवा रोवणीनंतर चार चुडांच्या चौकोनात एक युरिया डीएपी ब्रिकेट खोचून नत्रखत कार्यक्षमरीत्या पिकास उपलब्ध करून देणे, तणांचा बंदोबस्त करण्यासाठी तणनाशकांचा योग्य वेळेस वापर, भातपिकातील तणांच्या बंदोबस्ताकरिता कोनोविंडरचा वापर, कीड-रोग सर्वेक्षणानुसार कीड व रोग नियंत्रण उपाय,कीड नियंत्रणासाठी कामगंध सापळे, प्रकाश सापळे, पक्षीथांबे लावणे, जैविक कीडनाशकाचा वापर, पीक निसवताना व दाणे भरताना पुरेसे पाणी ठेवणे, भातपिकाच्या बांधावर तूर, भाजीपाला लागवड, भातकापणी यंत्राचा व भात मळणी यंत्राचा वापर, भातपिकानंतर उपलब्ध ओलाव्यावर हरभरा, वाल, चवळी या दुबार पिक लागवड, यांत्रिक सेवांचा वापर करावा, असा विश्वास कृषीतज्ज्ञांनी व्यक्त केला.
यांत्रिक पद्धतीने पुनर्लागवडीने
खर्च बचत
भाताच्या शेतीभोवती गिरी पुष्पाची लागवड करून चिखलणीच्या वेळी हिरवळीचे खत म्हणून गिरीपुष्पाचा पाला चिखलात ४ टन एकरी गाडावा. भाताची पुनर्लागवड यांत्रिकी पद्धतीने केल्यास खर्चामध्ये २५ ते ४० टक्के बचत होते. गादी वाफ्यावर टोकन पद्धतीने भात लागवड तंत्राचा अवलंब करावा. एका हंगामात तयार केलेले गादी वाफे न मोडता, त्यावर पुढील पिकाची टोकन केल्याने खर्च वाचतो.