आयात फर्निचर घोटाळ्यात बुडविला ३० कोटींचा महसूल; डीआरआयची छापेमारी, तीन जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 12:42 IST2025-07-24T12:40:41+5:302025-07-24T12:42:40+5:30
आलिशान फर्निचर मुंबईत आयात करत, त्यांची विक्री करणाऱ्या कंपन्यांनी परदेशांत काही बनावट कंपन्यांची स्थापना करत तेथून हे फर्निचर विकत घेतले.

आयात फर्निचर घोटाळ्यात बुडविला ३० कोटींचा महसूल; डीआरआयची छापेमारी, तीन जणांना अटक
मुंबई : परदेशातून आलिशान फर्निचर आयात करत आणि त्याची किंमत कमी दाखवत सीमाशुल्क बुडवण्याच्या गैरप्रकाराचा केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी मुंबईतील अनेक आलिशान फर्निचर दुकाने, कस्टम एजंट यांच्या कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली. शेकडो कोटी रुपयांच्या फर्निचर आयात घोटाळ्यांमध्ये आतापर्यंत ३० कोटी रुपयांचे सीमा शुल्क बुडवल्याचे आढळले असून, आतापर्यंत तिघाजणांना अटक केली आहे.
आलिशान फर्निचर मुंबईत आयात करत, त्यांची विक्री करणाऱ्या कंपन्यांनी परदेशांत काही बनावट कंपन्यांची स्थापना करत तेथून हे फर्निचर विकत घेतले. मात्र, भारतात त्यावर आकारले जाणारे सीमाशुल्क कमी करण्यासाठी या फर्निचरची किंमत त्यांनी कागदोपत्री ७० ते ९० टक्क्यांपर्यंत कमी दाखवली. या प्रकाराची माहिती ‘डीआरआय’च्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी काही कस्टम एजंटवर पाळत ठेवली व छापेमारी केली.
या छाप्यांदरम्यान त्यांना मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी छाननी केली असता आतापर्यंत ३० कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचे दिसून आले आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांत शेकडो कोटी रुपयांचे फर्निचर याच प्रकारे आयात झाले असून, महसूल बुडीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.