यदु जोशी -
मुंबई : शाळांमधील मुला-मुलींना राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दरवर्षी मोफत पुस्तक वाटप केले जाते. शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर ती त्यांनी शाळेला परत करावीत. सोबतच वह्याही परत कराव्यात. त्याच वह्या-पुस्तकांवर पुनर्प्रकिया करून नवीन वह्या-पुस्तकांचे मोफत वाटप विद्यार्थ्यांना करण्याचा उपक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविला जाणार आहे. शालेय शिक्षण विभाग त्यासाठी ‘मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना’ राबवेल.
‘पुनर्वापरातून परिवर्तनाकडे’ अशी या योजनेची टॅगलाइन असेल. शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. ते म्हणाले की, या निमित्ताने आपण वर्षभर जी वह्या-पुस्तके वापरतो, ती पुढच्या वर्षी प्रक्रिया होऊन इतर विद्यार्थ्यांना नवीन स्वरूपात मिळतील याची जाणीव विद्यार्थ्यांना होईल आणि बांधीलकी म्हणून ही पुस्तके आपल्याला परत करायची आहेत, याचीही जाणीव त्यांना असेल. सोबतच विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांच्या पैशांतून खरेदी केलेल्या वह्याही शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर त्यांनी परत केल्या तर त्यावर पुनर्प्रक्रिया करून भविष्यात वह्यांचे वाटपही मोफत करण्याचा विचार सरकारला करता येऊ शकणार आहे. विद्यार्थ्यांना तसेही आवाहन केले जाणार आहे.
१,००,९४,००० - विद्यार्थ्यांना यंदा मोफत पुस्तक ८९,१९६ - शाळांमध्ये पुस्तक वाटप
ज्या जिल्ह्यांमध्ये अशा शाळांची संख्या सर्वाधिक आहे त्यात अहिल्यानगर ४,६३९, नाशिक ४,७३१, पुणे ५,५१९ या जिल्ह्यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजनेमुळे मुला-मुलींमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होईल. कागदाची बचत होईल आणि पर्यावरण रक्षणाचा हेतूही साध्य होईल. सरकारवरील आर्थिक भार कमी होईलच, पण त्यापेक्षाही या उपक्रमामागील सामाजिक-पर्यावरणविषयक हेतू अतिशय महत्त्वाचा आहे. डॉ. पंकज भोयर, शालेय शिक्षण राज्यमंत्री