‘बार्टी’च्या संशोधक विद्यार्थी फेलोशिपपासून वंचित, राज्यातील ८६१ विद्यार्थ्यांच्या संशोधनावर परिणाम

By पोपट केशव पवार | Updated: April 16, 2025 17:12 IST2025-04-16T17:11:35+5:302025-04-16T17:12:22+5:30

पोपट पवार कोल्हापूर : एकीकडे समाजातील सर्व घटकांमधील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे, संशोधनाला चालना मिळावी, यासाठी सरकारने विविध ...

Research students at BARTI have not received fellowships for two years | ‘बार्टी’च्या संशोधक विद्यार्थी फेलोशिपपासून वंचित, राज्यातील ८६१ विद्यार्थ्यांच्या संशोधनावर परिणाम

‘बार्टी’च्या संशोधक विद्यार्थी फेलोशिपपासून वंचित, राज्यातील ८६१ विद्यार्थ्यांच्या संशोधनावर परिणाम

पोपट पवार

कोल्हापूर : एकीकडे समाजातील सर्व घटकांमधील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे, संशोधनाला चालना मिळावी, यासाठी सरकारने विविध योजना सुरू केल्या असल्या तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने या योजनांचा मूळ उद्देश बाजूला पडत असल्याचा प्रत्यय सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) विद्यार्थ्यांना येत आहे.

‘बार्टी’मधून वर्ष २०२१ मध्ये पीएच.डी.साठी नोंदणी केलेल्या आणि बार्टी फेलोशिपसाठी पात्र ठरलेल्या ८६१ संशोधक विद्यार्थ्यांना मागील दोन वर्षांपासून ही फेलोशिपच मिळाली नसल्याने या विद्यार्थ्यांची गोची झाली आहे.

महाराष्ट्र शासन आणि सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहन म्हणून ‘बार्टी’मार्फत पाच वर्षांसाठी मासिक फेलोशिप मंजूर केली जाते. तथापि, या फेलोशिपच्या कालावधीत विद्यार्थ्यांना कोणतीही खासगी किंवा शासकीय नोकरी करण्यास मनाई असते.

२०२१ मध्ये विविध विद्यापीठांमध्ये पीएच.डी.साठी राज्यभरातील ८६१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. या विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर झाली. पहिले दीड वर्ष नोंदणी दिनांकापासून फेलोशिप मिळालीही. मात्र, १ जानेवारी २०२३ पासून आजतागायत ही फेलोशिप मिळालेली नाही. विद्यार्थी दोन वर्षांपासून प्रत्यक्ष आर्थिक मदतीपासून वंचित आहेत.

विद्यार्थी आक्रमक

येत्या दोन दिवसांत फेलोशिपचे वितरण सुरू झाले नाही, तर ‘बार्टी’च्या पुणे येथील मुख्य कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विद्यार्थी कृती समितीने दिला आहे.

दृष्टिक्षेपात फेलोशिप

  • राज्यभरातील विद्यार्थी - ८६१
  • प्रत्येक महिन्याला ३७ हजार रुपये.

वर्ष २०२१ च्या नोंदणीकृत फेलोशिपधारक संशोधक विद्यार्थ्यांना कोणतीही फेलोशिप गेली दोन वर्षे मिळालेली नाही. त्याचा परिणाम त्यांच्या संशोधनावर होत आहे. तरी लवकरात लवकर करत शासनाने फेलोशिपचे वितरण करावे. - शिवतेज कांबळे, संशोधक विद्यार्थी, बार्टी, कोल्हापूर.
 

विद्यार्थ्याचे प्रोग्रेस रिपोर्ट जसे येत आहेत त्यानुसार फेलोशिप देण्याची कार्यवाही सुरु आहे. - डॉ.सारिका थोरात, प्रकल्प संचालक फेलोशिप विभाग, बार्टी. पुणे.

Web Title: Research students at BARTI have not received fellowships for two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.