नागपूर - मागील अधिवेशनात मुंबईत विधान भवनाच्या इमारतीत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारहाणीचा प्रकार घडला होता. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध झाला. या घटनेची गांभीर्याने दखल घेत विधानसभा अध्यक्षांनी चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितला होता. आज नागपूर अधिवेशनात हा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला.
शिवसेनेचे आमदार विशेषाधिकार समितीचे प्रमुख नरेंद्र भोंडेकर यांनी याबाबत सभागृहात अहवाल सादर केला. ते म्हणाले की, १७ जुलै २०२५ रोजी विधानसभेत अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असताना आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक सर्जेराव टकले यांनी आपापसात धक्काबुक्की करत अत्यंत आक्षेपार्ह कृत्य करून महाराष्ट्र विधानभवनाची प्रतिष्ठा आणि प्रतिमा मलिन केल्याने विशेषाधिकारी भंग आणि अवमान समितीचा अहवाल सादर करत आहे असं सांगितले.
समितीने काय केली शिफारस?
१७ जुलै २०२५ रोजी विधान भवनाच्या इमारतीत नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले यांनी मुंबई विधानभवनातील मुख्य इमारतीत एकमेकांना धक्काबुक्की केली. या प्रकरणी अध्यक्षांनी या घटनेचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते. समितीने या प्रकरणात एकूण १० बैठका घेतल्या. आव्हाड समर्थक नितीन देशमुख आणि पडळकर समर्थक सर्जेराव टकले यांचे साक्ष पुरावे नोंदवले. सर्व बाबींचा विचार करून समितीने शिफारसी केल्या आहेत.
विधान भवनासारख्या प्रतिबंधित क्षेत्रात गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असलेल्या व्यक्तींना विनापडताळणी प्रवेश न देणे
- विधान भवनात येणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी एक स्वतंत्र नियमावली तयार करण्यात यावी अशा नियमांचे काटेकोर पालन करावे.
- विधान भवनात यापुढे अशी घटना घडू नये सुरक्षा विभाग, पोलिस समन्वय ठेवून चोख सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यात यावी.
- विधानभवनात येणाऱ्या अभ्यंगतांची स्वयंचलित रिअलटाईम पार्श्वभूमी तपासण्यात येईल अशी यंत्रणा उभी करावी.
- अभ्यगंतांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात आल्यास त्याची प्रवेशिका तातडीने रद्द होईल असा डेटाबेस प्रवेश वितरण प्रणाली तज्ज्ञांकडून निर्माण करण्यात यावी
देशमुख-टकले यांना काय शिक्षा?
दरम्यान, विधान भवनातील या घटनेबाबत दंडात्मक कारवाई म्हणून नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले यांना २ दिवसांची कारावासाची शिक्षा देण्यात यावी. त्याशिवाय या दोघांनाही मुंबई, नागपूर विधान भवन परिसरात येण्यास हा विधानसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत म्हणजे २०२९ पर्यंत बंदी घालण्यात यावी अशी समितीने शिफारस केली आहे.
Web Summary : Report on Padalkar-Awhad supporters' clash in Vidhan Bhavan submitted. Recommends two-day jail for Nitin Deshmukh, Sarjerao Takle and bans entry till 2029. Security improvements advised.
Web Summary : पड़लकर-आव्हाड समर्थकों के विधान भवन में झगड़े पर रिपोर्ट पेश। नितिन देशमुख, सर्जेराव टकले को दो दिन की जेल और 2029 तक प्रवेश पर प्रतिबंध की सिफारिश। सुरक्षा सुधारों की सलाह।