भाजपच्या पराभवाचा अहवाल गुंडाळला, अमरावती पदवीधर मतदारसंघातील निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 06:33 IST2023-08-31T02:20:15+5:302023-08-31T06:33:32+5:30
फेब्रुवारीत या मतदारसंघात पाटील यांचा काँग्रेसचे धीरज लिंगाडे यांनी पराभव केला.

भाजपच्या पराभवाचा अहवाल गुंडाळला, अमरावती पदवीधर मतदारसंघातील निवडणूक
मुंबई : अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांच्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी नेमलेल्या एक सदस्यीय समितीच्या अहवालावर कोणतीही कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यावेळचे पक्षाचे उपाध्यक्ष सुनील कर्जतकर यांनी हा अहवाल दिला होता.
पाटील यांनी या मतदारसंघाचे दोनवेळा प्रतिनिधित्व केले होते. तथापि, चालूवर्षी फेब्रुवारीत या मतदारसंघात पाटील यांचा काँग्रेसचे धीरज लिंगाडे यांनी पराभव केला. या पराभवाचे आम्ही आत्मचिंतन करू असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगेच जाहीर केले. त्यानुसार पराभवाची कारणे शोधण्यासाठी सुनील कर्जतकर यांना जबाबदारी देण्यात आली.
कर्जतकर यांनी काही आमदार, नेत्यांशी मुंबईत चर्चा केली. नंतर अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलडाणा या पाच जिल्ह्यांमध्ये जाऊन त्यांनी अनेक जणांची मते जाणून घेतली.
पक्षातील नेत्यांनीच केले पराभूत?
पाटील यांना भाजपमधीलच काही नेत्यांनी पराभूत केले. ते निवडून आले तर पुन्हा मंत्री होऊन आपल्यासाठी डोकेदुखी ठरू शकतात, असे मंत्रिपदाच्या काही इच्छुकांना वाटले आणि त्यांनी छुप्या कारवाया केल्या, अशी चर्चा त्यावेळी होती.
अहवाल दिला; पुढे काय?
खात्रीलायक सूत्रांनी सांगितले की, अडीच महिन्यांपूर्वी कर्जतकर यांनी त्यांचा अहवाल प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे दिला. अहवालात पराभवासाठी कारणीभूत ठरलेली परिस्थिती विशद केली होती. मात्र, पराभवासाठी अमुकच नेते जबाबदार असल्याचा कोणताही उल्लेख नव्हता. मात्र, त्यांनी जी वस्तुस्थिती मांडली त्यावरून पराभवाचे सूत्रधार कोण हे लगेच लक्षात येण्यासारखे होते. मात्र, या अहवालावर भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत वा पक्षात कोणत्याही पातळीवर पुढे चर्चा झाली नाही.