अहिल्यानगर - जीवनात श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या शिर्डीतीलसाईबाबांचे देश-विदेशात कोट्यवधी भक्त आहेत. मात्र तलवार बाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिंदू सेनेचे संत युवराज यांनी साईबाबा यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. देशभरातील मंदिरातून साईंची मूर्ती हटवा या युवराज यांच्या विधानामुळे साईभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिर्डीत या प्रकरणी युवराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी लोकांनी केली आहे.
युवराज यांनी अलीकडेच साईबाबांबाबत वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट केला. त्यात ते म्हणाले की, काही मंदिरांमध्ये आजही साईबाबांच्या मूर्ती आहेत. ठिकठिकाणी साईबाबांची मंदिरे आहेत. सगळीकडे गल्ली-गल्लीत साईंची मंदिरे आहेत. हिंदूंना काय झाले माहिती नाही पण या सर्व मंदिरातून साईबाबांच्या मूर्ती हटवा. साईबाबांच्या मूर्ती तोडून त्या गटारात टाका. नदीमध्ये मूर्ती टाकून ती परत मिळेल असं करू नका. प्रत्येक मंदिरातून ही मूर्ती हटवा. जर मूर्ती हटवल्या नाहीत तर आम्ही जबरदस्तीने या हटवू. फरिदाबादमधून हे सुरू होईल. साईबाबा मुस्लीम होते, मासांहारी आणि व्यभिचारी होते असं संतापजनक विधान युवराज यांनी केले आहे.
युवराज यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून साईभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिर्डीतील साईबाबा संस्थानकडून शिर्डी पोलीस ठाण्यात यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साईबाबांची बदनामी केल्याप्रकरणी युवराज यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी साईभक्त करत आहेत. याआधीही सनातन रक्षक दलाकडून उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे काही मंदिरात साईबाबांची मूर्ती हटवण्यात आली होती. अयोध्येच्या हनुमानगढी मंदिराचे महंत राजू दास यांनीही साईबाबा हे धर्मगुरू, महापुरुष, पीर, अवलिया होऊ शकतात. पण ते देव, ईश्वर असू शकत नाहीत. सनातनी मंडळींनी सर्व मंदिरातून चांदपीर म्हणजे साईबाबा यांच्या मूर्ती हटविल्या पाहिजेत असं विधान केले होते.
दरम्यान, नुकत्याच व्हायरल संत युवराज व्हिडिओमुळे साईभक्तांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. शिर्डी ग्रामस्थांनी साईबाबा संस्थानकडे युवराजवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तर शिर्डी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार करण्यात आल्याचे साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले. साईबाबा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देश-विदेशातील भक्तांचे श्रद्धास्थान आहेत. सबका मालिक एक आणि श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांवर अशी टीका करणे म्हणजे समाजात शांतता भंग करण्यासारखे आहे. त्यामुळे या दोषीवर योग्य कारवाई करावी असं साईभक्त, सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिकाकडून प्रशासनावर दबाव टाकला जात आहे.