remove banners of PM Narendra Modi from Petrol Pumps, ST buses: Sachin Sawant | Vidhan sabha 2019 : पेट्रोल पंपांवरील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फलक काढा : सचिन सावंत
Vidhan sabha 2019 : पेट्रोल पंपांवरील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फलक काढा : सचिन सावंत

मुंबई :  विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाल्याने विविध राजकीय पक्षांचे फलक प्रशासनाकडून काढण्यात येत आहेत. विरोधी पक्षांच्या फलका प्रमाणेच राज्यभरातील पेट्रोलपंपावर लावलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फलक तसेच इतर सरकारी जाहिरातींचे फलक तात्काळ काढावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेश कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून केली आहे. 


 यासंदर्भात सावंत म्हणाले की, निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणुकीच्या घोषणेनंतर राज्यभरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता लागू झाल्याने प्रशासनाने विविध राजकीय पक्षांचे परवानग्या घेऊन लावलेले फलक काढले आहेत. आचारसंहितेनुसार फलक काढण्यावर कुणाचाही आक्षेप नाही, पण या नियमानुसार सर्वच राजकीय फलक निवडणूक आयोगाने काढणे अपेक्षित आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले फलक आजही राज्यातील बहुतांश पेट्रोलपंपांवर लावलेले आहेत. सर्व राजकीय पक्षांसाठी एकच नियम असताना या फलकांबद्दल प्रशासन बोटचेपी भूमिका का घेत आहे? आचारसंहितेच्या नियमानुसार प्रशासनाने विरोधी पक्षांच्या नेत्यांचे सर्व फलक काढले आहेत. पण  सत्ताधारी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहिराती पेट्रोलपंपांवर लावलेल्या आहेत, त्या तात्काळ काढून टाकाव्यात, असे सावंत म्हणाले.


 यासोबतच महाराष्ट्र शासनाकडून राज्य परिवहन विभागाची बस स्थानके, एस. टी. बसेस, रेल्वे स्थानके तसेच विविध महापालिकांच्या परिवहन विभागाच्या बसेसवर सरकारी जाहिराती लावलेल्या आहेत. अपेक्षा होती की निवडणुकीची आचारसंहिता लागल्यावर निवडणूक आयोग हे सर्व फलक काढण्याचे आदेश देईल. पण तसे न झाल्याने नाईलाजाने ही तक्रार करावी लागते आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू असलेल्या सर्व ठिकाणाच्या सरकारी जाहिराती काढण्याचे तात्काळ स्थानिक प्रशासनाला आदेश द्यावेत, अशी मागणी सावंत यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली आहे.


Web Title: remove banners of PM Narendra Modi from Petrol Pumps, ST buses: Sachin Sawant
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.