Remdesivir Injection: The state needs 50,000 remdesivir per day; 70% supply to Maharashtra | Remdesivir Injection : राज्यात दिवसाला ५० हजार रेमडेसिविरची गरज; ७० टक्के पुरवठा महाराष्ट्राला

Remdesivir Injection : राज्यात दिवसाला ५० हजार रेमडेसिविरची गरज; ७० टक्के पुरवठा महाराष्ट्राला

मुंबई : राज्यात दररोज ५० हजार रेमडेसिविर इंजेक्शनची गरज असून, तेवढ्या इंजेक्शनचा पुरवठा होत आहे, तर मुंबईत सध्या दिवसाला तीन ते अडीच हजार रेमडेसिविर व्हायल्सची गरज भासत आहे,  पालिका रेमडेसिविर खरेदीसाठी कोणत्याही अन्य यंत्रणेवर अवलंबून न राहता स्वतः खरेदी करत आहे. पालिकेच्या या पूर्वनियाेजनामुळे पालिका रुग्णालयात रेमडेसिविरचा कधीच तुटवडा भासत नाही, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागासह पालिका प्रशासनाने दिली आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच रेमडेसिविर उत्पादकांसोबत झालेल्या बैठकीप्रमाणे कंपन्यांच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे ७० टक्के पुरवठा राज्याला केला जात आहे. टास्क फोर्सच्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, सध्याची काेराेनाची वाढती रुग्णसंख्या पाहता एप्रिलअखेर दिवसाला किमान दीड लाख इंजेक्शनची आवश्यकता भासू शकते. त्यासाठी उत्पादन दुप्पट करण्याचे सुचविले आहे.
तर राज्यात कुठेही १,४०० रुपये या किमतीतच रेमडेसिविर मिळाले पाहिजे, असे आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन रेमडेसिविरचे उत्पादन १५ दिवसांत दुप्पट होणार असल्याचेही ते म्हणाले.

इंजेक्शन मिळविणे झाले अवघड
इंजेक्शन खरेदीसाठी आधारकार्ड, प्रिस्क्रिप्शन सक्तीचे केल्याने हे इंजेक्शन मिळविताना नाकीनऊ येत आहेत, अशी अपेक्षा आहे, असे रुग्णाचे नातेवाईक वंदना आशापुरा यांनी सांगितले.

प्रिस्क्रिप्शन न देता मागणी
मुलुंड येथील खासगी रुग्णालयाने विनाप्रिस्किप्शन रेमडेसिविर घेऊन येण्यास सांगितले. मात्र, कुणीच ते दिले नाही. एफडीएने प्रिस्क्रिप्शनची सक्ती केल्याने अखेर रुग्णालय प्रशासनाने चिठ्ठी दिली. त्यामुळे आठ तासांनंतर इंजेक्शन मिळाले, असे रुग्णाचे नातेवाईक दयावंत भोसकर म्हणाले.

मागील काही काळात रुग्णसंख्या कमी झाल्याने सरकारने कंपन्यांना उत्पादन कमी करण्याचे निर्देश दिले होते. आता अचानक कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे उत्पादकांशी चर्चा करून त्वरित उत्पादन वाढविण्यास सांगितले आहे.
    - बी. मंत्री, सहायक आयुक्त, 
    अन्न व औषध प्रशासन विभाग

 ...तर तक्रार नोंदवा!
- डॉक्टरांनी अत्यावश्यक असेल तरच रुग्णास रेमडेसिविर घेण्याची चिठ्ठी द्यावी. रेमडेसिविरची गरज भासल्यास अन्न औषध प्रशासनाच्या राज्यस्तरीय नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. 
- काळाबाजार करणाऱ्यांची माहिती १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर द्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Remdesivir Injection: The state needs 50,000 remdesivir per day; 70% supply to Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.