धर्मस्वातंत्र्य विधेयक मंजूर; विरोधकांमध्ये पडली फूट; उद्धवसेनेचा पाठिंबा, तर काँग्रेसचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 06:57 IST2026-03-17T06:56:57+5:302026-03-17T06:57:22+5:30
मुख्यमंत्री म्हणाले की, असे विधेयक आणणारे महाराष्ट्र पहिले नाही. बारा राज्यांनी हा कायदा आणला आहे. हे विधेयक कोणा धर्माच्या विरोधात नाही.

धर्मस्वातंत्र्य विधेयक मंजूर; विरोधकांमध्ये पडली फूट; उद्धवसेनेचा पाठिंबा, तर काँग्रेसचा विरोध
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत धर्मस्वातंत्र्य विधेयक मांडले आणि ते आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हे विधेयक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. विधेयकावरून विरोधकांमध्ये फूट पडल्याचे दिसून आले. उद्धवसेनेचे भास्कर जाधव यांनी हे विधेयकाचे समर्थन केले. तर काँग्रेसचे अस्लम शेख, अमीन पटेल यांनी विरोध करत विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवावे अशी मागणी केली.
मुख्यमंत्री म्हणाले की, असे विधेयक आणणारे महाराष्ट्र पहिले नाही. बारा राज्यांनी हा कायदा आणला आहे. हे विधेयक कोणा धर्माच्या विरोधात नाही. बळजबरी, फसवणूक, बेकायदेशीर धर्मांतरण रोखण्यासाठी आहे. धर्मांतर करूच नये यासाठी हे विधेयक नाही. बेकायदेशीर धर्मांतरावरून अनेकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. तो होऊ नये म्हणून विधेयक आहे.
तरतुदींचे उल्लंघन करून धर्मांतरण केल्यास शिक्षा
संविधानाच्या कलम २५ अन्वये प्रत्येकाला धर्म अवलंबिण्याचा अधिकार दिला आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने एक गोष्ट सांगितली, की हा अधिकार काही मर्यादा घालून देण्यात आला आहे. सन १९६८ पासून राज्यांनी यासंदर्भात कायदे केले आहेत. हे काही आजच होत नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
या कायदयातील तरतुदींचे उल्लंघन करून जर धर्मांतरण केले तर ती व्यक्ती किंवा संस्था हे शिक्षेस पात्र असतील. अशा पद्धतीने झालेले धर्मांतरण शून्यवत व निरर्थक होईल.