पुणे, सातारा, कोल्हापूरला दिलासा; अतिवृष्टी होणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 03:19 AM2019-08-10T03:19:14+5:302019-08-10T06:21:01+5:30

पावसाचा जोर ओसरला, हवामान विभागाची माहिती

Relief to Pune, Satara, Kolhapur; It won't rain | पुणे, सातारा, कोल्हापूरला दिलासा; अतिवृष्टी होणार नाही

पुणे, सातारा, कोल्हापूरला दिलासा; अतिवृष्टी होणार नाही

Next

मुंबई : महापुराचा तडाखा बसलेल्या पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात ८ ते १० दिवस पडत असलेल्या पावसाचा जोर आता ओसरला आहे. आता पाऊस कमी असून, त्याची तीव्रताही कमी झाली आहे. येथील पावसाची नोंद ३०० मिलीमीटरहून १५० मिलीमीटरपर्यंत खाली आली आहे. परिणामी आता पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला नाही.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, विदर्भात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला आहे. दरम्यान, महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर ताशी ६० किमी वेगाने वारे वाहतील. समुद्र खवळलेला राहील. मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

सिंधुदुर्गमध्ये अतिमुसळधार
१० ऑगस्ट रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात हलक्या पावसाची नोंद होईल. रत्नागिरी, जळगाव, पुणे, कोल्हापूर, सातारा येथे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल.

आज मुंबईत जोरदार सरी
११ ऑगस्ट : शहर आणि उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.

राज्यासाठी अंदाज
१० आॅगस्ट : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
११ आॅगस्ट : पश्चिम किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहील.
१२ आॅगस्ट : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.

Web Title: Relief to Pune, Satara, Kolhapur; It won't rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.