‘सीसीएमपी’ अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना दिलासा, होमिओपॅथी डॉक्टर ‘एमएमसी’मध्ये नोंद करू शकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 12:05 IST2025-09-06T11:59:05+5:302025-09-06T12:05:26+5:30
‘सीसीएमपी’ अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

‘सीसीएमपी’ अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना दिलासा, होमिओपॅथी डॉक्टर ‘एमएमसी’मध्ये नोंद करू शकणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: होमिओपॅथी शाखेतील ज्या डॉक्टरांनी सीसीएमपी (सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी) हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यांची नोंद महाराष्ट्र वैद्यकीय परिषद ( एमएमसी) या ठिकाणी स्वतंत्र नोंद वही करून ठेवण्याच्या निर्णयास इंडियन मेडिकल असोसिएशन विरोध केला होता. त्यामुळे होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी थांबविण्यात आली होती. मात्र वैद्यकीय शिक्षण विभागाने शुक्रवारी निर्णय घेऊन अशी नोंद करण्यास हरकत नसल्याचे पत्रक एमएमसीला काढून ही नोंद करावी, असे सांगण्यात आले.
काही महिन्यांपूर्वी होमिओपॅथी विरुद्ध ॲलोपॅथी असा संघर्ष राज्यात दिसला होता. होमिओपॅथी डॉक्टरांची नोंद ॲलोपॅथीच्या परिषदेत होऊ नये यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने राज्यभर विरोध केला होता. त्यानंतर ही नोंद थांबविण्यात आली होती. विशेष म्हणजे हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले होते. सीसीएमपी हा अभ्यासक्रम म्हणजे ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठीचा एक सकारात्मक आणि आवश्यक पुढाकार असून, त्याला विरोध नव्हे तर पाठबळ द्यावे, अशी भूमिका होमिओपॅथी कौन्सिलने घेतली होती.
होमिओपॅथी परिषदेकडून स्वागत
याप्रकरणी, महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेचे प्रशासक डॉ. बाहुबली शहा यांनी सांगितले की, सत्याचा नेहमी विजय होतो. हे आजच्या शासनाच्या निर्णयावरून दिसून आले आहे. आमचा हक्क जो हिरावून घेतला होता तो आम्हाला पुन्हा बहाल झाला आहे. याचा आम्हाला आनंद याचे आम्ही स्वागत करतो. तर इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. संतोष कदम यांनी या निर्णयाचा विरोध केला आहे. त्या सांगितले, हा निर्णय चुकीचा आहे. हे प्रकरण न्यायप्रविशष्ट आहे. आम्ही आमची बाजू उच्च न्यायालयात मांडू.