तानाजी सावंत अन् वाद यांच्यातील नाते जुनेच; पुणे, धाराशिवमध्ये अनेकदा ओढवून घेतली टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 06:23 IST2025-03-02T06:20:27+5:302025-03-02T06:23:56+5:30
तानाजी सावंत हे यापूर्वीही अनेकदा वादग्रस्त ठरल्याचे त्यांची राजकीय वाटचाल सांगते.

तानाजी सावंत अन् वाद यांच्यातील नाते जुनेच; पुणे, धाराशिवमध्ये अनेकदा ओढवून घेतली टीका
लोकमत न्यूज नेटवर्क, धाराशिव/ पुणे: तानाजी सावंत आरोग्यमंत्री असताना राज्यातील रुग्णालयांमध्ये सफाई करण्यासाठी ३१९० कोटी रुपयांचे दिलेले कंत्राट रद्द झाले असले तरी सावंत या निमित्ताने पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सावंत हे यापूर्वीही अनेकदा वादग्रस्त ठरल्याचे त्यांची राजकीय वाटचाल सांगते.
धाराशिव जिल्ह्यात असताना त्यांनी ‘महाराष्ट्र भिकारी होईल, पण हा तानाजी सावंत होणार नाही’, असे वक्तव्य करून वाद ओढवून घेतला होता. तसेच ऐन निवडणूक काळात ‘ज्यांच्या विरोधात लढण्यात आपण हयात घालवली, त्या राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळ बैठकीत बसताना मळमळ होते’, असेही विधान करून खळबळ उडविली होती.
उद्धवसेनेचे खा. ओमराजे निंबाळकर यांच्यावर वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करीत बाप काढला. यामुळेही त्यांनी मोठा रोष ओढवून घेतला होता. ते पालकमंत्री असताना स्वतःच्या मतदारसंघात अधिक निधी वळविण्यावरूनही वादाचे प्रसंग उभे राहिले होते.
कोण आहे हा हाफकिन, त्याच्यावर बंदी घाला’ आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांना हा आदेश देणारे दुसरे तिसरे कोणी नव्हते तर दस्तुरखुद्द तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत होते. अगदी ताजा वाद म्हणजे मुलाच्या अपहरणाची फिर्याद देणे, त्यासाठी सरकारी यंत्रणेचा वापर करून त्याचे बँकॉकला चाललेले चार्टर्ड विमान अर्ध्या हवाई रस्त्यातून मागे वळवणे हा प्रकार.
लेटरबॉम्ब टाकत अधिकाऱ्याचे आरोप
पुणे महापालिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा त्यांचा किस्साही भलातच प्रसिद्ध आहे. त्यावेळेस ते आरोग्यमंत्री होते. त्यांनी आरोग्य अधिकारी म्हणून एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली, मात्र त्यांच्याकडून सावंत यांचे काम होईना, त्यामुळे मुदतीच्या आतच बदली केली.
संबंधित अधिकारी मॅटमध्ये गेला. निकाल त्याच्याच बाजूने लागला. राग मनात धरून त्या अधिकाऱ्याच्या मागे त्यांनी यंत्रणा लावली व अधिकाऱ्यांचे एक प्रकरण शोधून काढून निलंबित केले. अधिकाऱ्याने एक लेटरबॉम्ब टाकत सावंत यांच्यावर आरोप केले होते.
नातेवाइकाचे बिल कमी केले नाही म्हणून एका रुग्णालयाच्याही मागे तपासणीचे शुक्लकाष्ठ लावले होते अशी चर्चा त्यावेळी रंगली होती. आरोग्य खात्याला होणाऱ्या औषधांचा पुरवठा थांबवणे, विशिष्ट कंपनीलाच ते काम मिळावे यासाठी आग्रह धरणे, असे विषयही गाजले.