अन्य समाजातील पत्नीला नांदवायला नकार
By Admin | Updated: January 21, 2017 03:26 IST2017-01-21T03:26:24+5:302017-01-21T03:26:24+5:30
प्रेमविवाहाच्या चार महिन्यांनंतर अन्य समाजातील पत्नीला नांदवायला नकार देणाऱ्या पतीला नेरूळ पोलिसांनी अटक केली
अन्य समाजातील पत्नीला नांदवायला नकार
नवी मुंबई : प्रेमविवाहाच्या चार महिन्यांनंतर अन्य समाजातील पत्नीला नांदवायला नकार देणाऱ्या पतीला नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे. समाजात बदनामी होत असल्याचे कारण सांगून त्याने कुटुंबीयांच्या सांगण्यावरून पत्नीला दूर केले होते. याप्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संकेत देवळे असे नेरूळ पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने चार महिन्यांपूर्वी अन्य समाजातील तरुणीसोबत मंदिरात प्रेमविवाह केला होता. तेव्हापासून ते दोघे नेरूळमध्येच भाडोत्री घरामध्ये राहत होते. मात्र त्यांच्या लग्नाची कल्पना संकेतच्या कुटुंबीयांना नव्हती. यामुळे तो ठरावीक वेळी पत्नीकडे तर इतर वेळी कुटुंबासोबत राहायचा. परंतु काही दिवसांपासून त्याने पत्नीकडे जाण्याचे टाळले होते. यामुळे पत्नीने त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने घरच्यांना आपल्या लग्नाविषयी कळले असून, त्यांचा तुला विरोध असल्याचे सांगितले. तसेच तुझ्यासोबत लग्न केल्यामुळे समाजात बदनामी होत असल्याचेही
कारण सांगत पत्नीला नांदवायला नकार दिला होता.
यामुळे पीडित तरुणीने १८ जानेवारीला नेरूळ पोलिसांकडे पतीविरोधात तक्रार केली होती. त्यानुसार अॅट्रॉसिटी गुन्ह्यांतर्गत संकेत देवळे याला अटक केल्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक राजपूत यांनी सांगितले. त्याशिवाय संकेतची आई व बहीण यांच्यावरही
छळवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक
तपास करत आहेत. (प्रतिनिधी)