तृतीयपंथीयांच्या एमपीएससी भरती प्रक्रियेत सुधारणा, कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल होताच आयोगाने घेतली दखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 12:52 IST2025-08-27T12:51:23+5:302025-08-27T12:52:01+5:30
तांत्रिक बिघाडामुळे तृतीयपंथीयांचे अर्ज ऑनलाइन यंत्रणेमध्ये स्वीकारले जात नव्हते

तृतीयपंथीयांच्या एमपीएससी भरती प्रक्रियेत सुधारणा, कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल होताच आयोगाने घेतली दखल
कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध पदांच्या भरती प्रक्रियेसाठी तृतीयपंथी असा स्वतंत्र विभाग तयार केला आहे. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे तृतीयपंथीयांचे अर्ज ऑनलाइन यंत्रणेमध्ये स्वीकारले जात नव्हते. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्याकोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल होताच, आयोगाने याची दखल घेऊन ऑनलाईन भरती प्रक्रियेत सुधारणा केली.
तसेच आयोगाने कोणतीही जाहिरात काढताना तांत्रिक बाबींची नीट खबरदारी घ्यावी. तृतीयपंथीयांसाठी पर्याय खुला ठेवावा, असे निर्देश न्यायमूर्तीनी दिले. ही माहिती विभागीय तृतीयपंथी हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळाच्या सहअध्यक्ष शिवानी गजबर यांनी दिली.
लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी तृतीयपंथीयांना अर्ज भरताना येणाऱ्या अडचणीसंदर्भात गजबर यांनी मे २०२५ मध्ये आयोगाच्या सचिव सुवर्णा खरात यांची भेट घेतली होती. तसेच ऑनलाईन अर्ज भरती प्रक्रियेत सुधारणा करण्याची विनंती केली होती. मात्र, आयोगाकडून कोणतीही सुधारणा झाली नव्हती. अखेर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली. याची माहिती मिळताच आयोगाने अर्ज भरती प्रक्रियेत सुधारणा केली. तसेच गजबर यांचा अर्ज भरून घेतला.
या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायमूर्तीनी आयोगाला खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. अॅड. अमित साळी यांनी गजबर यांची बाजू न्यायालयात मांडली. तसेच अॅड. जयेश उमेशचंद्र मोरे यांचे सहकार्य लाभले.