महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा; काँग्रेस नेत्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 17:59 IST2021-11-18T17:59:25+5:302021-11-18T17:59:49+5:30
महाराष्ट्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील सेस कमी करुन जनतेला दिलासा द्या असं काँग्रेसनं मागणी केली आहे.

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा; काँग्रेस नेत्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी
मुंबई : केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई प्रचंड वाढली असून सामान्य जनतेला या महागाईने जगणे मुश्कील झाले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सर्वच सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. पंजाब व राजस्थान सरकारने ज्या पद्धतीने पेट्रोल डिझेलच्या करामध्ये कपात करून जनतेला दिलासा दिला त्याचपद्धतीने आपल्या राज्यातील जनतेच्या हितासासाठी पेट्रोल डिझेलवरील सेस कमी करून दिलासा द्यावी अशी मागणी माजी मंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नसीम खान म्हणतात, केंद्र सरकारने मागील सात वर्षात पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून १०० रुपये प्रति लिटर रुपयांच्यावर गेले आहेत. एलपीजी गॅसही ९०० रुपये झाला आहे. मोदी सरकारने सातत्याने केलेल्या दरवाढीमुळे सामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या महागाईमुळे वाहतुकीचा खर्च वाढून इतर वस्तुंच्या किमती वाढतात, प्रवासाचा खर्चही वाढतो. कोरोनामुळे आधीच लोकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला असून त्यांच्यासमोर अनेक समस्या उभ्या ठाकलेल्या आहेत. या दुष्टचक्रात सामान्य जनता भरडली जात असून त्यांचे जगणे कठीण झाले आहे.
पेट्रोल डिझेलवरील कररुपाने राज्याला मिळणारा पैसा केंद्र सरकार वेळेवर देत नाही, त्यातच सेसच्या पैशातील हिस्सा राज्यांना मिळतच नाही तो फक्त केंद्र सरकारलाच मिळतो. यातून राज्याची आर्थिक कोंडी होत आहे परंतु जनतेला दिलासा देणे आपले कर्तव्य आहे. राज्यातील जनतेच्या हितासासाठी महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून आपण पेट्रोल डिझेलवरील सेस कमी करून दिलासा द्यावा, असे नसीम खान म्हणाले.