‘त्या’ तीन जातींना वगळण्याची शिफारस; उपसमितीनं मंत्रिमंडळात मांडला अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 08:38 IST2022-04-29T08:38:22+5:302022-04-29T08:38:42+5:30
कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबीचा समावेश

‘त्या’ तीन जातींना वगळण्याची शिफारस; उपसमितीनं मंत्रिमंडळात मांडला अहवाल
मुंबई : कुणबी, कुणबी-मराठा अन् मराठा-कुणबी या जातींचा सारथी आणि महाज्योती या दोन्ही संस्थांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. मात्र, दोनपैकी एका संस्थेतून त्यांना वगळले जावे, अशी शिफारस मंत्रिमंडळ उपसमितीने केली आहे. उपसमितीच्या शिफारशी मंत्रिमंडळाच्या गुरुवारच्या बैठकीत स्वीकारण्यात आल्या.
मंत्रिमंडळ उपसमिती या तिन्ही समाजातील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेईल, असे स्पष्ट करण्यात आले. बारा बलुतेदारांसाठी उद्योग विभागाकडे देण्यात आलेल्या योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडे वर्ग कराव्यात, तसेच बारा बलुतेदारांच्या कल्याणासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे, अशी शिफारस उपसमितीने केली आहे. छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार, गुलाबराव पाटील आणि आधी संजय राठोड यांचा समावेश होता.
उपसमितीच्या शिफारशी
विमुक्त जाती, भटक्या जमाती-ब यांच्यासाठी क्रिमिलेअर अट रद्द करा. महाज्योतीसंस्थेस १५० कोटी रुपये इतका निधी वाढवून द्यावा.
इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे २०१९-२० मधील प्रलंबित १२०० कोटी रु. तात्काळ द्यावेत. विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठीची प्रक्रिया सुरू ठेवा.