Rebellion is not in my blood - Pankaja Munde | भाजपा सोडण्याच्या चर्चांवर पंकजा मुंडेंनी केला मोठा खुलासा

भाजपा सोडण्याच्या चर्चांवर पंकजा मुंडेंनी केला मोठा खुलासा

मुंबईः मी भाजपा सोडणार नसून बंडखोरी माझ्या रक्तात नसल्याचा खुलासा भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी केला. एबीपी माझाशी बातचीत करताना त्या बोलत होत्या. मी भाजपाची प्रामाणिक कार्यकर्ती आहे. मी पक्षासाठी काम केलेलं आहे. भाजपा सोडत असल्याच्या अफवांमुळे व्यथित आहे. मी यासंदर्भात 12 डिसेंबर रोजी बोलणार आहे. तेव्हा मी काय ते स्पष्ट करेन, अशी भूमिकाही त्यांनी मांडली आहे.

मला आता घर बदलायचं आहे. मी म्हटलं होतं 12 डिसेंबरला बोलेन, मला आत्मचिंतनासाठी आणि स्वतःशी संवाद साधण्यासाठी वेळ हवा आहे. तो वेळ मला दिला पाहिजे. आताच त्याच्यावर फार भाष्य करणं योग्य होणार नाही. मी दरवर्षी गोपीनाथ गडावर मोठा कार्यक्रम घेते. काही वृत्तपत्रांनी मी पक्ष सोडणार अश्या बातम्या लावल्या होत्या, त्यामुळे फारच दुखी झाले. मला कुठलं पद मिळू नये का, यासाठी हे सगळं चाललं तर नाही ना, असा मला प्रश्न पडतो आहे. मी खूपच व्यथित आहे. मी मुख्यमंत्री होणार अशा प्रकारच्या बातम्या आल्या होत्या.

मग जनतेच्या मनातील मी मुख्यमंत्री अशादेखील बातम्या छापल्या होत्या. निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत मी सभा घेत होते. कधीही कुठल्या पदासाठी लाचारी स्वीकारली नाही, कधीही कुठलं पद स्वीकारण्यासाठी दबावतंत्र वापरलं नाही. हे माझ्या रक्तात नाही. मला आत्मचिंतनाची आणि आपल्या लोकांशी काय बोलायचं आहे, यासाठी वेळ नक्कीच दिला पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि राज्याच्या माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे नाराज आहेत का?, असतील तर कोणावर आणि कशासाठी नाराज आहेत?, याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळी चर्चा रंगली होती. ती जाणून घ्यायची असतील तर मागे जावे लागेल.

ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण विभागात आपल्याला निर्णयांचे फारसे स्वातंत्र्य नव्हते. विशेषत: महिला व बालकल्याण विभागातील कामे ही वरून ठरल्यानुसारच करावी लागायची ही त्यांची भावना असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. परळीमध्ये त्यांचे बंधू पण कट्टर प्रतिस्पर्धी धनंजय मुंडे यांना आपल्याच पक्षाच्या सरकारकडून बळ दिले जाते, निधी दिला जातो, अशी त्यांची भावना होती. त्यातच परळीमधील पराभव पंकजा यांच्या जिव्हारी लागला. त्यासाठी पक्षांतर्गतही दगाफटका झाल्याची त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rebellion is not in my blood - Pankaja Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.