‘अनुभवाचा सच्चेपणाच लेखकाला घडवितो’
By Admin | Updated: March 16, 2016 08:36 IST2016-03-16T08:36:59+5:302016-03-16T08:36:59+5:30
कथा ही लेखकाच्या अनुभव आणि त्याने जोपासलेल्या नैतिक मूल्यभावातून जन्म घेते. बदलती मूल्ये, मूल्यभावांमधील संघर्ष, संवेदना आणि काळाचा

‘अनुभवाचा सच्चेपणाच लेखकाला घडवितो’
कोल्हापूर : कथा ही लेखकाच्या अनुभव आणि त्याने जोपासलेल्या नैतिक मूल्यभावातून जन्म घेते. बदलती मूल्ये, मूल्यभावांमधील संघर्ष, संवेदना आणि काळाचा दाब कथेच्या निर्मितीत महत्त्वाचा आहे. अनुभवाला भिडण्याचा सच्चेपणाच लेखकाला घडवत जातो, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक भास्कर चंदनशिव यांनी मंगळवारी येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभाग आणि राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे आयोजित नवलेखक कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठाच्या वि. स. खांडेकर भाषा भवनात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
चंदनशिव म्हणाले, कथाकार हा सामान्य माणसांच्या जगण्याशी एकरूप होऊन सामान्यांच्या जगण्यातील वेदनेला शब्दरूप देत असतो. संपूर्ण साहित्याच्या मुळाशी मानवी वेदनाच असते. लेखक ‘नाही रे’ वर्गाचा आवाज आपल्या साहित्यातून मांडत असतो. १९४५ पासून पडणाऱ्या प्रत्येक दुष्काळाने मूल्यांची उलथापालथ केली. बीड, उस्मानाबादमधील जीवघेण्या दुष्काळाने मला लेखक बनविले. समकालीन वास्तव हे गतीने बदलत असून या काळाने नवलेखकांसमोर अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. लेखकाच्या सच्चेपणातूनच चांगली कथा जन्मते आणि अशी कथाच मानवी जीवनाचे सत्य सांगणारी असते. ती समाज वास्तवाचा, मानवी संवेदनेचा इतिहास बनते.
उद्घाटनानंतरच्या सत्रात कथाकार आसाराम लोमटे यांनी आपल्या कथानिर्मितीचा प्रवास उलगडून दाखविला. त्यांनी सांगितलेली आपल्या विविध कथांची निर्मिती प्रक्रिया शिबिरार्थींना ऊर्जा देणारी होती. तिसऱ्या सत्रात कथाकार भारत काळे, कृष्णात खोत आणि किरण गुरव यांनी आपल्या कथालेखनाचा प्रवास आणि निर्मिती सांगितली. (प्रतिनिधी)