Raut warns by Maratha kranti Morcha on issue of Udayan Raje | उदयनराजेंना छत्रपतीचे वंशज असल्याचा पुरावा मागणाऱ्या राऊतांना मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

उदयनराजेंना छत्रपतीचे वंशज असल्याचा पुरावा मागणाऱ्या राऊतांना मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई - शिवसेनेची स्थापना करताना शिवरायांच्या वंशजांना विचारले होते का ? शिवसेनेचे नाव बदलून ठाकरेसेना करा असा सल्ला देणाऱ्या उदयनराजे भोसले यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन या, असे आव्हान संजय राऊत यांनी उदयनराजेंना दिले आहे. आता यावरून वाद होण्याची शक्यता आहे. 

पुण्यात सुरू असलेल्या लोकमत पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी राऊत यांनी उदयनराजेंना पुन्हा एकदा आव्हान दिले. मात्र या वक्तव्यामुळे मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून राऊत यांना इशारा देण्यात आला आहे. 

तुम्ही राजकारणात कोणाचे नाव घेऊ आहात हे तपासा. छत्रपतींच्या घराण्याविषयी चुकीचे वक्तव्य केल्यास त्याला सोडणार नाही असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबा पाटील यांनी संजय राऊत यांना दिला. तसेच शिवाजी महाराजांच्या जागेवर आम्ही उदयनराजेंना मानतो. वादग्रस्त पुस्तक लिहिणाऱ्या जयभगवान गोयल यांच्याविषयी बोलण्याऐवजी तुम्ही छत्रपती घराण्याविरुद्ध बोलत आहात. तुम्हाला वंशज असल्याचे पुरावे हवे असल्यास तुम्ही साताऱ्यात यावे, असंही आबा पाटील म्हणाले. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करतो की, तुम्ही शिवसेनेच्या नेत्यांना आवरा. आम्ही तुमचा सन्मान करतो. मात्र छत्रपती घराण्यावर शिवसेनेतील एखादा नेता बोलत असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही. आम्हाला रस्त्यावर उतरायला लावू नका, असा इशारा आबा पाटील यांनी दिला.  यावेळी त्यांनी राऊत यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणीही केली. 
 

Web Title: Raut warns by Maratha kranti Morcha on issue of Udayan Raje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.